कविता – श्रावणातला शिवस्पर्श...
भोळ्या बाबा...
श्रावण आलाय पुन्हा,
मनाच्या उंबऱ्यावर
शिवनामाचा सडा शिंपडतोय...
पावसाच्या रिमझिम लयीत
श्रावणातला शिवस्पर्श जागतो...
घनगर्जनेच्या पार्श्वसंगीतात,
तुझं “हर हर” कानावर येतं –
आणि हृदय नकळत...
नतमस्तक होतं.
डोंगरांच्या कडांवरून
घन शंख फुंकतात,
आणि निसर्ग...
तुझा अभिषेक करतो.
पाने, फुले, गंध, गारवा –
सगळं काही तुझ्यासाठीच!
शंभो...
आसमंत तुझ्या आठवणींनी भरून आलाय.
जणू रुद्राक्षाच्या माळेसारखे
झाडांवर लुकलुकतात थेंब...
बिल्वपत्रांचा गंध
मनाच्या उर्मीवर थरथरतो,
त्या प्रत्येक पानात
मी... माझं अस्तित्व विसरतो...
आणि तुझ्यात विरघळतो.
तू डमरूचा ताल आहेस,
तू श्वासांचा गाभा आहेस,
तू दगडात नाहीस रे बाबा...
तू माझ्या... अंतर्मनात आहेस.
कधी वाघाचे चर्म पांघरून,
कधी गंगेचं पाणी केसांत साठवून,
तर कधी नागमण्यांच्या मुकुटात...
आणि तरीही इतका साधा,
भोळा, भाबडा,
भक्तांचा सोबती...
श्रावणातलं आभाळ –
तुझ्यासारखंच भरलेलं असतं...
शांत, खोल, ओलसर...
आणि तरीही सामर्थ्यशाली!
तुझ्या दर्शनाने
मन झरझर ओलावतं.
स्मरणांच्या प्रार्थनांनी,
पापण्यांच्या कडांवरून
आठवणींचा ओघळ सुरू होतो...
तू तांडव करतोस,
पण माझ्या आत कुठेसं
मौन नाचू लागतं...
ते... तुझंच रुप असतं ना?
भोळ्यानाथा...
तू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेस,
तू माझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ आहेस.
तू पर्वतावरचा अधीर आवाज...
तू मंदिरातला शांत घंटानाद...
तू भाळावरचं शुद्ध भस्म...
आणि तूच ओठांवरचा ओजस्वी गजर –
श्रावणातला... शिवस्पर्श...
हर हर महादेव!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २८/०७/२०२५ वेळ : २२:५०
Post a Comment