कविता – नागपंचमी – शाश्वत श्रद्धेचा संवाद


कविता – नागपंचमी – शाश्वत श्रद्धेचा संवाद

पावसाच्या थेंबांनी माती चिंब झाली की…
शेतीचा सुगंध हवेत दरवळतो,
आणि वाऱ्याच्या फुसफुसण्यातून
तू शब्दांशिवाय संवाद साधतोस…
मातीच्या काळ्याशार कुशीतून
तू संथ सळसळत वर येतोस —
जणू धरतीच्या स्पंदनात लपलेली
एक शांत, सावध श्वासरेषा.

तू भीती दाखवत नाहीस,
तू स्मरण करून देतोस
आदिम नात्याचं —
त्या काळाचं
जेव्हा माणूस आणि निसर्ग
एकमेकांत विरघळून गेले होते.

तू आहेस भूमीचा प्रहरी,
बीजांचं रक्षण करणारा,
गुप्त राखण करणारा —
संजीवक संरक्षक!

आज पंचमी…
आई आंब्याच्या पानावर
दूध ठेवते, कुंकू उमटवते,
आणि म्हणते —
"नागराजा, सुखात रहा…
आमचं घरटं सुरक्षित ठेव."

त्या क्षणी
मातृस्नेहासारखी निसर्ग नम्रता
पिढ्यान्‌पिढ्या वाहणारी श्रद्धा
हळुवार उतरते ओंजळीत.

तुझ्या फणावर
निवांत वेल फुलते —
ती आपली श्रद्धा असते,
निसर्गाशी गूढ संलग्न नात्याची.

तू नाग नाहीस फक्त —
तू स्मृती आहेस त्या काळाची,
जेव्हा पूजनात माणूसही झुकायचा
प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वापुढे.

नागपंचमी ही केवळ परंपरा नाही,
ती आहे एक स्मरण…
की आपण या धरतीवर
एकटे नाही,
तर सहजीवनात जगणारे घटक आहोत!

माझ्याही मनाच्या खोलवर
एक नाग वास करतो —
शांत, सजग आणि सतत सतर्क…
भीती नव्हे,
तर अंतर्यामी चेतनेचं प्रतीक बनून.

तो आठवण करून देतो
माझ्या दुर्लक्षित संवेदना,
दडपलेल्या इच्छा,
आणि अजूनही न उमजलेल्या
प्रश्नांच्या गूढ गुहांमधून.

तो वळवळतो…
जेव्हा मी निसर्गापासून दूर जातो,
जेव्हा मी अस्तित्व विसरतो,
तेव्हा तो मला जागं करतो
माझ्या मुळांशी,
माझ्या भूमीशी,
माझ्या स्वत्वाशी!

तो नाग…
माझा अंतःप्रकाश आहे,
जो मला दरवर्षी आठवण करून देतो —
की हे फक्त पूजन नाही,
तर आहे
आत्म्यांना जोडणारा
शाश्वत श्रद्धेचा संवाद.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक २९/०७/२०२५ वेळ : ०६:०३

Post a Comment

Previous Post Next Post