कविता – "मोल..."
अंग, पाय, मन चिंब भिजवून
पावसात झेललेला ओला वारा...
तप्त उन्हात सावली देणारी ती छत्री –
सुखाच्या कोवळ्या उन्हात झाली अनाथ,
फेकली गेली कोपऱ्यात… विसरून!
ठेच लागू नये म्हणून
क्षणोक्षणी हातात हात धरून चाललेली –
अंधारात वाट दाखवणारी ती काठी,
उजेड दिसताच, ती झाली भार…
दूर भिरकावली गेली!
भुकेच्या तडफडीत
झटपट उचलेली ती थाळी –
साक्षात अन्नदात्री वाटलेली...
पण खाऊन झाल्यावर
ठरली फक्त खरकटी,
नकोशी… तुच्छ…
आणि दूर लोटली गेली.
तीच गोष्ट माणसांची…
गरजेपुरता उपयोगी,
पण वेळ गेली की... व्यर्थ!
काम झालं की विसरणं —
हेच का तुमचं प्रेम?
हाच का तुमचा स्नेह?
“कामापुरता मामा”
हाच का नात्यांचा खरा अर्थ?
माणसाच्या अस्तित्वाला
उपयोगाच्या मोजपट्टीवर मोजायचं का?
की शोधायचं त्याच्या असण्यामागचं... खरंखुरं "मोल"?
एक दिवस,
तुम्हीच दुर्लक्षित केलेली ती माणसं,
आयुष्याच्या एखाद्या अंधारात
उजेड घेऊन परत येतील...
एकही शब्द न बोलता,
डोळ्यांत प्रश्न घेऊन
तुमच्या बंद दाराशी उभी राहतील…
तेव्हा तरी ओळखू येईल का
त्यांचं खरं मोल?
मनाच्या आरशात…
माणसांचं मोल ओळखा.
कारण वेळेच्या वाळवंटात,
पसाऱ्यांनी भरलेलं हृदयही
कधी रिकामं होऊ शकतं…
"कधी तरी,
खरकटी झालेली थाळीही
तुम्हाला अन्नाच्या अभावाची जाणीव करून देईल...
आणि फेकलेली छत्री
पावसात भीजणाऱ्या डोक्यावर हसू शकेल!"
“मोल” म्हणजे फक्त किंमत नव्हे,
तर असण्यामागचं सत्त्व…
...आणि ते वेळीच ओळखा!"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३०/०७/२०२५ वेळ : ०५:३१
Post a Comment