नाट्यपरीक्षण : ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ – भय आणि वास्तव यांची धूसर सीमारेषा


नाट्यपरीक्षण : ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ – भय आणि वास्तव यांची धूसर सीमारेषा

रात्र, शांतता आणि एक विशिष्ट क्षण – दोन वाजून बावीस मिनिटं. या क्षणाला सुरू होणारी ही कथा केवळ भयनाट्य नाही, तर मानवी भावविश्वाच्या खोल अंधारात डोकावणारी एक मानसिक थरारयात्रा आहे. विजय केंकरे दिग्दर्शित आणि नीरज शिरवईकर लिखित “दोन वाजून बावीस मिनिटांनी” हे नाटक प्रेक्षकांना त्या ठिकाणी नेऊन ठेवतं, जिथं वास्तव आणि आभास यांची सीमारेषा धूसर होते.

ही कथा केतन, ऋतिका, दुर्गेश आणि सोनाली या चार पात्रांभोवती फिरते. मात्र केंद्रस्थानी आहे केतन आणि ऋतिका यांची मुलगी — जी रंगमंचावर कधीच दिसत नाही, पण तिचं अस्तित्व ठळकपणे जाणवत राहतं. हे नुसतं घर नसून, त्या घरात काहीतरी आहे... काहीतरी, जे शब्दात मांडता येत नाही.

केतन (अनिकेत विश्वासराव) एक खगोलशास्त्रज्ञ असूनही त्याला स्वतःच्या घरातील अंध:कार अनाकलनीय वाटतो. तारकांचा अभ्यास करणारा केतन जेव्हा आपल्या जगण्यातल्या छायांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याच्या बुद्धिवादी दृष्टिकोनाची मर्यादा उघड होते. अनिकेतने ही द्वंद्व मनःस्थिती संयत अभिनयातून प्रभावीपणे साकारली आहे.

ऋतिका (गौतमी देशपांडे) केतनची पत्नी. घरातील अस्वस्थतेचा भार संपूर्णपणे तिच्यावर असतो. आई म्हणून तिचं आतलं जग अधिक गोंधळलेलं, भेदरलेलं आहे. ऋतिका आणि दुर्गेश यांच्यात काही प्रसंगी होणारा डोळ्यांतून संवाद – ही नजरा नजरेतली अधूरी भाषा – नाटकाच्या आशयाला भावनिक गहिरेपणा देते.

दुर्गेश (प्रियदर्शन जाधव) नाटकाच्या सुरुवातीला हास्याचा शिडकावा करणारा, पण जसजसे नाटक पुढे सरकते, तसतसा गंभीर, समजूतदार मित्राच्या रूपात उलगडणारा. तो केतन आणि ऋतिका यांच्याशी अनोख्या बंधात गुंतलेला आहे. त्याचा ऋतिकाशी असलेला अधुरेपणा नाट्याला सूक्ष्म भावनिक उंची देतो. काही प्रसंगांत केवळ डोळ्यांतून होणारा संवाद, ऋतिका आणि दुर्गेशमधील नात्याला गूढ संदर्भ जोडतो.

सोनाली (रसिका सुनील) एक समंजस मानसोपचारतज्ज्ञ. तिचं आणि केतनचं अधुरं प्रेमकथानक नाटकात खोलवर गुंफलेलं आहे. दोघांमध्ये भावना आहेत, पण वेळ, परिस्थिती आणि अव्यक्तपणामुळे त्या व्यक्त होत नाहीत. सोनाली ही केवळ मानसोपचारतज्ज्ञ नसून एक सजग निरीक्षक आणि अंतर्गत संघर्षांनी भरलेली स्त्री आहे. रसिकाने ती भूमिका प्रगल्भतेने साकारली आहे.

तांत्रिक बाजू : नेपथ्य, संगीत, प्रकाश व ध्वनी

नेपथ्य – नीरज शिरवईकर यांचे नेपथ्य दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जाऊन अर्थवाही ठरतं. त्यात टेलिस्कोप – केतनच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं प्रतीक ठरतो. जिना – वरच्या खोलीत असलेल्या मुलीकडे जाणारा मार्ग. मुलगी – प्रत्यक्षात अदृश्य असूनही नाटकाचा गाभा. संगीत – अजित परब यांचं पार्श्वसंगीत आणि जितेंद्र जोशी यांचं गीत नाटकाला गूढतेची लय देतात. प्रकाशयोजना व ध्वनी – सूचक, नाट्यपूर्ण. कुठेही अतिनाटकीपणा न होता, ‘भीती’ ही जाणवते – दाखवली जात नाही.

“तुला खरंच वाटतं का की एखाद्या आत्म्यामुळे एखादं घर अस्वस्थ होतं?” हा संवाद नाटकाचा गाभा आहे. नाटक कोणत्याही बाजूला झुकत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा, अपूर्ण नातेसंबंध, मनातील अंध:कार आणि गूढतेच्या छायेतून उलगडणाऱ्या भावना – हे सर्व विचारप्रवृत्त करतं. यामध्ये कुणी खलनायक नाही, पण कुणीतरी काहीतरी लपवत आहे, ही सततची भावना नाटकाला वेगळी गूढता देते.

‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे नाटक प्रेक्षकाच्या मनात प्रश्न निर्माण करतं, पण उत्तरं देत नाही – कारण ती उत्तरं प्रेक्षकानेच शोधायची असतात. गूढतेच्या पार्श्वभूमीवर नात्यांची, मनोव्यथांची आणि अस्वस्थतेची केलेली उत्कट उजळणी म्हणजे हे नाटक. भय, विनोद, आशंका, रहस्य, प्रेम, आणि त्यामागे दडलेली गूढ भावना – हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल, तर हे नाटक चुकवू नका.

नाटक : दोन वाजून बावीस मिनिटांनी
लेखक व नेपथ्य : नीरज शिरवईकर
दिग्दर्शक : विजय केंकरे
निर्माते : अजय विचारे
संगीत : अजित परब
गीत : जितेंद्र जोशी
कलाकार : अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे, रसिका सुनील आणि प्रियदर्शन जाधव

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २७/०७/२०२५ वेळ : १०:४४

Post a Comment

Previous Post Next Post