कविता – आउटलेट

कविता – आउटलेट

मनाचं हे धरण –
अजस्त्र, खोल, शांत…
पण गप्प असतं,
शब्दांच्या काठावरून
फक्त वाहतं – आतल्या आत!

हसऱ्या चेहऱ्याच्या आड
दडलेला असतो एक गहिवर—
बदकाच्या पायांसारखा,
पाण्यावर शांत... 
पण आतल्या आत थकवणारा
जो केवळ त्यालाच कळतो.

माणूस
ताजमहालासारखा देखणा,
पण आतून रिकामा, निःशब्द—
त्या शांततेच्या सोबतीला 
न दिसणारा, न ऐकू येणारा 
अश्रूंचा झराच वाहत असतो.

हिटलर…
भैय्यूजी महाराज…
साने गुरुजींची करुणा,
शीतल आमटेचं प्रखर भान,
सुशांत सिंगचं पडद्यामागचं दु:ख…
या साऱ्यांना हवं होतं—
एक "आउटलेट"...

पण तोंड उघडलं नाही,
आणि मन तुटून गेलं.
शब्द निघाले नाहीत,
आणि श्वास थांबले…

पाण्याला जर वेस असेल
पण वाट नसेल,
तर पूर येतोच!
धरण फुटतं…

शरीरही त्याला अपवाद नाही.
मनाचं डबकं
कधी आटत नाही —
फक्त साचत जातं…
आणि शेवटी
भंडावणाऱ्या प्रश्नात
बुडून जातं!

म्हणून
आउटलेट हवंच असतं—
एक मित्र,
एक खांदा,
एक "बोल ना!" म्हणणारं मन…

मग अश्रू वाहतात,
मन मोकळं होतं,
आणि हसू हळूहळू परत येतं.

हे तोंड, हे डोळे, हे हात—
सगळं मोकळं करायला शिकावं लागतं.
नाहीतर आपणच
आपल्याला हरवतो!

पंखा, पिस्तूल, रेल्वेचे रूळ—
हे मार्ग नसून धोक्याच्या वाटा आहेत,
उत्तर आहे फक्त एकच—
“मी ऐकतोय…” म्हणणं!

म्हणूनच
मनाच्या दरवाजावर
टकटक करत रहा.
बोला, व्यक्त व्हा, रडा, हसा—
भांडा, पण मोकळे व्हा!

मित्र…
परिवार…
हेच खरे बेस्ट आऊटलेट!

मन हे धरण आहे…
आणि ते मोकळं होण्यासाठी
"आउटलेट" हवंच!

"मिस यू" म्हणण्याची वेळ येऊ नये,
म्हणून मनापासून ‘विथ यू’ म्हणा!"

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २३/०७/२०२५ वेळ : ०८:०१

Post a Comment

Previous Post Next Post