कविता - नात्यांची वीण
प्रस्तावना: “नातं”… एक शब्द… पण त्यात किती भावना, किती ऋतू, किती गंध असतो ना…?
कधी नकळत जुळलेलं, कधी जपून ठेवलेलं, आणि कधी हरवलेलं… पण खरं म्हणजे — नातं ‘मिळवणं’ नाही, तर ‘जपणं’ हेच खरं कसब असतं…
मिळवणं कठीण नसतं —
हसणं, बोलणं क्षणभर जुळलं की
ओळख होते…
आणि ओळखीतून उमलतात
मैत्री, प्रेम, आपुलकीचे धागे…
पण कठीण असतं —
त्या क्षणांना मनात जपणं,
शब्दांआड दडलेली भावना
उमजून घेत नात्यांना जिवंत ठेवणं…
संबंधांमध्ये येणाऱ्या ऋतूंना
संवेदनांनी समजून घ्यावं लागतं —
हिवाळ्यासारखी शांतता गोठवते,
उन्हासारखा आत्माभिमान चटके देतो,
आणि पावसाच्या थेंबांसारखा
मनात साठतो हलकासा रुसवा…
नातं असतं फुलासारखं —
प्रेमाच्या पाण्यात रोज भिजलं,
तर ते ताजं राहतं…
नाहीतर मौनाच्या सावलीत
हळूहळू सुकतं, गळून जातं…
विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली नाती
नाजूक असतात – पण आतून प्रबळ,
त्यांना हवी असते —
सहवासाची ऊब
आणि समर्पणाचं नितळ पाणी…
क्षणभराचा राग,
अहंकाराचं क्षणिक वादळ,
अपेक्षांची हळवी जखम —
हे सगळं सहन करत
मनाच्या अंतरंगात
विश्वासाची कुलूपं लावून
हे नातं जपावं लागतं…
जसंच्या तसं नाही —
तर हळुवारपणे, नाजूकपणे,
ओझं वाटू न देता…
आधारभूत होईपर्यंत!
"मिळणं" हे नशिबाचं असतं,
पण "जपणं" ही कला आहे —
आणि तीच खरी
नात्यांची परीक्षा…
कारण…
संबंध सांभाळणं म्हणजे
देवघरात रोज तेवणारा एक दीप —
ज्याच्या मंद प्रकाशात
आपलं जगणं उजळतं…
जे बंध मनापासून जपले जातात,
तेच वाढत जातात —
जणू भावविश्वातल्या मण्यांची माळ,
जी मनमंदिरात
शांततेने समाधानाने नांदते…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०२/०७/२०२५ वेळ : ०४:५०
Post a Comment