नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व
(कार्यकाळ : २६ जून १८८८ - १५ जुलै १९६७)
कविता - स्वरगंधर्व – बालगंधर्व
गंधित झाला होता रंगमंचाचा श्वास,
स्वरांच्या स्पंदनात नांदत होता देव्हारा.
गुंजत होती पदरांतून वाहणारी शांत याचना,
अन् भान हरपून ऐकत राहिला काळही.
स्वरांमध्ये प्रकटत गेलं एक नित्य नवं स्त्रीत्व,
नाट्यरूपांतून गवसला एक कोमलतेचा झराच जणू.
‘शाकुंतल’ साकारताना
प्रेक्षकांच्या डोळ्यांत बहरायचं पाण्याचं स्वप्न.
पदन्यासांचे पडसाद
आजही ऐकू येतात नेपथ्याच्या गाभाऱ्यात,
तानांतून वाहत राहतात
भक्ती, विरह, करुणा, उत्कटतेचे सात्विक सूर.
शब्द फक्त उच्चार नव्हते,
त्यांना लाभलं होतं जीवनाचं संवेदनशील भान.
ज्यांना शब्द नव्हते, आवाज हरवला होता –
त्यांच्यासाठीही गायलात एका समर्पित अंत:करणानं.
रंगमंचावर जेव्हा झळकत होतं
ते अलौकिक तेजस्वरूप सौंदर्य,
स्त्रीपणाचं सत्त्व परिधान करताच
थांबून जात असे क्षणभर काळही;
रंगभूमीच्या हृदयात रुतून बसलेली एक प्रेरणा.
स्वरांनी कोरून ठेवला
मराठी मनावर एक अवीट मधुर ठसा –
जो वेदनेचा नव्हे,
तर स्मरणाचा, अभिमानाचा, गौरवाचा दीप.
गंधर्व मंडळी ही केवळ संस्था नव्हती,
ती होती एक संजीवनी देणारी सांस्कृतिक शाळा.
जिच्या अधिष्ठानावर उभा होता
मराठी नाटकाचा दिव्य शिखरस्तंभ.
गोहरमधून उमलवला
एक नवा सूर, नवा ताजेपणा,
‘एकच प्याला’मधून मांडली
संवेदनांच्या व्याकुळतेची अंतिम मर्यादा.
टिळक, अत्रे, पु. ल. –
हे सारे त्या सौंदर्याचे, प्रतिभेचे साक्षीदार.
वयाच्या मोजपट्टीवर थांबूनही
कधीच वृद्धत्वाचा स्पर्श झाला नाही त्या गायकीला –
कारण आजही स्वरांमध्ये फुलतो
काळजाचं कोवळं वसंतगान.
स्मृतीरूपाने उभारले गेले
‘बालगंधर्व रंगमंदिर’ रूपी वास्तुचिन्ह,
पण हृदयामध्ये कोरले गेले
एक अखंड वंदनीय मंदिर – स्वरगंधर्वांचे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १५/०७/२०२५ वेळ : १३:०५
Post a Comment