चित्रपट परीक्षण — सितारे ज़मीन पर : "नॉर्मल" तेच्या पलीकडचा स्पर्श


चित्रपट परीक्षण — सितारे ज़मीन पर : "नॉर्मल" तेच्या पलीकडचा स्पर्श

तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर आमिर खानने सितारे ज़मीन पर या चित्रपटातून पुनरागमन केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात तो अगदी साध्या शैलीत गाडीतून उतरताना दिसतो. या एन्ट्रीमध्ये कोणताही "मास मसाला" नाही. कदाचित हा आमिरचा स्वतःचा "नॉर्मल" स्वभाव असेल. चित्रपट सुरू होतो आणि पाच मिनिटांसाठी तुम्हाला असे वाटते की आमिर लाल सिंग चड्ढा सारख्याच भूमिकेत शिरतोय का? अनेक दृश्यांमध्ये तो समान भाव देताना दिसतो, पण सुदैवाने, हळूहळू तो त्याच्या पात्राचा सूर पकडतो.

मूळ चित्रपटात प्रशिक्षकाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यापेक्षा आमिरचा टोन खूप वेगळा आहे. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षा खूप वेगळा आहे, ज्यासाठी तो ट्रोलही झाला आहे. येथे अनेक मजेदार देसी तडके जोडले गेले आहेत आणि संपूर्ण चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे — तो तुम्हाला कुठेही कंटाळा आणत नाही. मंद आणि भावनिक असूनही, चित्रपट योग्य वेळी वेग पकडतो. हा चित्रपट तुम्हाला डाउन सिंड्रोम आणि न्यूरो डायव्हर्जन्सवर एका अनोख्या पद्धतीने संदेश देतो. हा संदेश सांगताना तो तुमच्या भावना कुरवाळतो आणि समाजात "नॉर्मल" समजल्या जाणाऱ्या चौकटींच्या बाहेरचा विचार करायला लावतो.

हा पूर्णपणे आमिरचा चित्रपट नाही. प्रत्येक पात्राला पूर्ण जागा देण्यात आली आहे. मग ती आमिरची आई असो किंवा आमिरची पत्नी सुनीता यांच्या भूमिकेत असलेली जेनेलिया डिसूझा देशमुख असो — ती चित्रपटात सौंदर्य आणते. तिच्या बोलण्याच्या पद्धतीत थोडीशी संथता आहे... याचे कारण चित्रपटाच्या शेवटपर्यंत समजत नाही, कारण जेनेलियाची हिंदी खूप चांगली आहे... असो, जेव्हा इतर गोष्टी चांगल्या असतात तेव्हा काही कमतरता आपोआप दुर्लक्षित होतात. तिच्या अभिनयात सोज्वळता आहे. आणि एक प्रसंग — जिथे ती पोलीस असल्याचा बनाव करते — तेथे तिचं ठसठशीत, थोडं बनावट बोलणं सहजच हास्य निर्माण करतं.

चित्रपटात जीवंतपणा आणण्याचं काम निश्चितच १० खास कलाकारांचे होते आणि दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांची प्रशंसा करावीच लागेल की, त्यांनी या मुलांकडून अद्भुत काम करून घेतलं आहे. त्या सर्वांची स्वतःची कथा आहे, जी हळूहळू पुढे जाते आणि शेवटी तुम्ही त्या सर्वांच्या प्रेमात पडता. सतबीरपासून गुड्डूपर्यंत, शर्माजींपासून गोलूपर्यंत — तुम्ही दहाही खास कलाकारांच्या प्रेमात पडता, कारण त्यापैकी कोणीही "अभिनय" केलेला नाही. त्यांनी त्यांची खरी निरागसता आणि अस्तित्व दाखवले आहे. चित्रपट डॉली अहलुवालिया, गुरपाल सिंग आणि ब्रिजेंद्र काला यांच्याशिवाय तो अपूर्ण वाटला असता. त्यांनी साकारलेली पात्रं ही चित्रपटाच्या हळुवार गाभ्याला योग्य दिशा देतात.

अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर आमिरने त्याचे काम खूप चांगले केले. त्याच्या पात्रात अनेक पदर आहेत, जे तुम्हाला त्याच्याच शैलीत पाहण्याचा आनंद मिळेल. जेनेलिया पडद्यावर गोंडसपणा आणते आणि तिचा अभिनय नेहमीच सच्चा वाटतो. या दोघांबरोबरच खास मुलांच्या नैसर्गिक अभिनयाची छाप दीर्घकाळ स्मरणात राहते. त्यांच्या एकेका संवादामध्ये जीवनाचं गूढ उलगडताना जाणवतं. एक प्रसंग आहे जिथे या खास मुलांचा काळजीवाहक आमिरला "नॉर्मल" आणि "वेडा" असण्यातील फरक समजावून सांगतो — “नॉर्मल और पागल में सिर्फ एक लाइन होती है, समझे?” — हा प्रसंग विनोदी पद्धतीने तुमचे डोळे उघडतो आणि समजतं की खरंतर त्या सीमारेषा आपल्या नजरेतूनच निर्माण झालेल्या असतात.

दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी चित्रपट कुठेही कंटाळवाणा होऊ दिला नाही. जनरेशन झेड पिढी भावनिक दृश्यांनी कंटाळू लागताच, प्रसन्ना त्यात एक विनोदी प्रसंग घेऊन येतात. विनोदाद्वारे त्यांनी अनेक मोठे संदेश दिले आहेत. चित्रपटात आमिरचा एक संवाद आहे जिथे तो म्हणतो — “मैं इन बच्चों को नहीं सिखा रहा हूं, ये बच्चे मुझे बहुत कुछ सिखा रहे हैं.” — हा संवाद म्हणजेच या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल की आपण खूप काही शिकून निघालो.

संगीताच्या आघाडीवर शंकर-एहसान-लॉय आणि राम संपत यांनी दिलेलं संगीत दृश्यांना भावनिक बळ देते. अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतांना सौंदर्य लाभले आहे. पार्श्वसंगीत हे चित्रपटातील कोवळ्या भावनांप्रमाणेच धीटपणे नव्हे तर हळुवारपणे मनात खोलवर झिरपत राहतं. छायाचित्रणाचं काम जी. श्रीनिवास रेड्डी यांनी संजीवक रितीने सांभाळलं असून, चारु श्री रॉय यांचं संकलन चित्रपटाचा गतीमानपणा राखून ठेवतं.

एकंदरीत, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, हा चित्रपट बऱ्याच काळानंतर बॉलिवूडला दिलासा देऊ शकतो. पुष्पा सारखा दोन दिवसांत १०० कोटी कमवू शकणार नाही, परंतु तो मौखिक प्रचाराद्वारे वेग घेऊ शकतो. हे देखील शक्य आहे की, हा चित्रपट विशिष्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकणार नाही, कारण प्रत्येकाचे स्वतःचे "नॉर्मल" आहे. हो, हे निश्चित आहे की, जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पडद्यावरून गायब असलेल्या आमिर खानची आठवण येत असेल आणि तुम्हाला भावनिक संदेश देणारा चित्रपट पहायचा असेल, तर तुम्ही हा चित्रपट सहकुटुंब पाहू शकता. जर तुम्हाला एक्शन, रोमान्स किंवा मारधाड चित्रपटांची आवड असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही.

“सितारे ज़मीन पर” म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर अंतःकरणाचा कोमल स्पर्श आहे — असा स्पर्श जो तुम्हाला स्वतःकडे बघायला भाग पाडतो आणि एका नव्या नजरेतून जग अनुभवायला शिकवतो.

चित्रपट: सितारे ज़मीन पर
कलाकार: आमिर खान, जेनेलिया देशमुख, आरुष दत्ता, सिमरन मंगेशकर, वेदांत शर्मा, नमन मिश्रा, ऋषी सहानी, ऋषभ जैन, आशिष पेंडसे, संवित देसाई, आयुष भन्साली, गुरपाल सिंग, ब्रिजेंद्र काला, गोपी कृष्णन वर्मा, डॉली अहलुवालिया
लेखक: दिव्या निधी शर्मा
दिग्दर्शक: आर.एस. प्रसन्ना
निर्माते: आमिर खान आणि अपर्णा पुरोहित
छायांकन: जी. श्रीनिवास रेड्डी
संकलन: चारु श्री रॉय
संगीतकार: शंकर-एहसान-लॉय, राम संपत
गीतकार: अमिताभ भट्टाचार्य

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३०/०६/२०२५ वेळ : ०६:१२

Post a Comment

Previous Post Next Post