कविता - शब्दांची रेंज

कविता - शब्दांची रेंज

शब्दांची रेंज जर असेल अनलिमिटेड,
तर मनाच्या लहरी सहज जुळतात —
मोबाईल सिग्नल जरी गेले,
तरी हृदयांचं नेटवर्क अचूक सांधतात!

शब्द केवळ उच्चार नसतात,
ते असतात मनांवर उमटलेली स्पंदनं —
दोन मनांना जोडणारे ब्रिज,
ज्यामुळे मौनही बोलू लागतं...

जेव्हा शब्द रेंगाळतात नजरेत,
तेव्हा एक स्माईल खूप काही सांगतं —
कधी "कसा आहेस?" इतकंच पुरतं,
जिवाभावाचं नातं पुन्हा रिबूट करायला...

शब्द जर निवडले गेले हळुवारपणे,
तर वादही बहरतो संवादात...
जिथे कटुता विरते शांततेत,
आणि दुःखात ढळणारी आसवं 
एका क्षणात होतात आनंदाश्रू.

खरंच शब्दांची रेंज वाढवली पाहिजे,
फक्त बोलण्यासाठी नव्हे —
तर ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी,
माणसाला धरून ठेवण्यासाठी...

म्‍हणूनच —
"मी आहे इथे" हे सांगताना
एक साधा “हो” देखील
जरा जपून उच्चार कर,
कारण — क्षणात तुटलेलं नेटवर्क
कधी-कधी पुन्हा रिकनेक्ट होत नाही...

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २९/०६/२०२५ वेळ : १३:३२

Post a Comment

Previous Post Next Post