कविता - उत्सव शब्दसुरांचा
शब्दांचे दवबिंदू ओघळत गेले,
गझलेच्या मोरपिसावरून —
सुरांनी हळूच हात धरला...
आणि उत्सव शब्दसुरांचा झाला.
हा उत्सव नव्हे केवळ गीतांचा,
हा तर श्वास आहे मराठीचा —
जिथे प्रत्येक अक्षराला असते चव,
आणि प्रत्येक स्वराला ठाव...
कधी झुळूक होऊन स्पर्शणारा,
कधी ढगफुटीसारखा कोसळणारा,
कधी लयीत गोंजारणारा,
कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारा.
कवितेचा शब्द जणू
माहेरचा उंबरठा —
वाचनाचा स्वर म्हणजे
घरात झंकारणारा तानपुरा.
कवितांच्या साखळीत गुंफलेली आर्तता,
हरवलेल्या आठवणींचा भास,
सहज सुचलेली एखादी चाल
साऱ्या आसवांना लय देऊन जाते...
कधी भैरवीसारखी निवांत विराजते,
कधी अभंगासारखी मनात भिनते,
कधी वाऱ्यासारखी शिंपते सुरांची पालवी,
कधी सुमनासारखी उमलते ‘भावकविता’.
हा फक्त कार्यक्रम नाही —
हा तर आहे मनाचा साज,
गायिकेच्या स्वरातली आर्तता,
पर्णावरून रंगमंचापर्यंत दरवळणारी
सांस्कृतिक आपुलकी...
हेच खरे शब्दसुरांचे वैभव!
म्हणूनच...
प्रत्येक स्वर, प्रत्येक शब्द
हा एक दीप आहे
शब्दसुरांच्या या उत्सवात —
प्रकाश देणारा,
स्पर्श करणारा,
आणि अंतर्मनात
सदैव घुमणारा...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २९/०६/२०२५ वेळ : ००.३६
Post a Comment