कविता - असंही... तसंही...

कविता - असंही... तसंही...

भेगाळलेले ओठ, घसा कोरडा, शुष्क...
तहान कधीच सुकलेली...
माझ्याकडे पाहत
ढग पुन्हा एकदा दाटलेले,
पण प्रत्येक थेंबात
विषाचं निळसर सावट उतरलेलं...

घोटभर घेतला,
तर आत्मा जळून जायचा;
आणि न घेतला, तर
श्वासही उरात नसायचा!

असंही... मरण अटळ, तसंही...

श्वासांत गुंतलेली
एक अतूट आकांक्षा —
मी तिला विचारलं :
"कुठे गं, इतकी घट्ट गुंतलीस?"

ती हसून म्हणाली :
"श्वासांबरोबर गुंतून साचून गेलीय...
ना सावरता येतं,
ना विसरता येतं तुला!"

असंही... ओढ खोल, तसंही...

रात्र उलटून जायची,
आणि झोप दूर पळायची...
उशीखालची स्वप्नं
हळूहळू कोलमडून जायची...

आणि जागेपणीची स्वप्नं —
अलवार उडून जायची
वाऱ्याच्या एखाद्या फसव्या झुळुकीवर...

असंही... अपूर्ण, तसंही...

काळ म्हणायचा :
"थोडा धीर धर..."
आणि धीर म्हणायचा :
"थांब, वेळ गाठूया!"
पण क्षण मात्र —
नेहमी निसटून जाताना, हसून म्हणायचा...

असंही... हातचं गेलं, तसंही...

आयुष्याविषयी
काय अन् किती सांगावे?
कधी शब्द अपुरे,
कधी अश्रूच बोलके!

तरीही,
मी गप्प बसतो...
कारण, तू जे काही दिलंस,
तेही कित्येकांना लाभलं नाही!

असंही... तुझं ऋण, तसंही...

रोज शिकवण देतोस
तुझ्या प्रत्येक कृतीतून —
कधी झळाळती सूर्यकिरणं,
तर कधी झाकोळलेलं आभाळ...

तरीही...
हसतो हलकासा,
स्वतःलाच समजावत —
"हेच तर जीवन!"
कधी गोड गुलकंदासारखं,
कधी चटके देणारं अंगारासारखं...

असंही... सुंदर, तसंही...

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ३०/०५/२०२५ वेळ ०८:०१

Post a Comment

Previous Post Next Post