कविता - निष्ठेची विक्री
निष्ठा विकली त्यांनी,
विश्वास गमावून,
ज्यांच्यामुळे उभं राहिलं जीवन,
त्याच मुळांना टाकलं उखडून.
आईच्या पदराखाली वाढले,
गुरूच्या सावलीत घडले,
आणि शेवटी —
त्याच सावल्यांना
स्वार्थाच्या ज्वाळांत जाळले.
अस्तनितले सर्प होते ते —
हसऱ्या चेहऱ्यांमागे लपलेले,
पण पाठीवर
विषारी दंश देणारे.
रंग बदलणाऱ्या
सरड्यालाही मागे टाकणारे!
‘स्वतःला घडवलंय मी’ —
अशी आत्मप्रौढी मिरवणारे,
भूतकाळाचे सत्य
विसरू पाहतात;
पण स्मृतीच्या फलकावर
ते सत्य आजही झळकतं.
विश्वासघाताच्या पायावर
उभारलं उंच शिखर,
पण त्याच्या पायाखाली
माणुसकीची राख साचलेली.
काळ पाहतो आहे...
हिशेब मागायचाच आहे अजून.
त्या वेळी
ना मुखवटे उरतील,
ना सौदे...
फक्त —
उघडं, भेदक, निर्विकार सत्य!
त्या सत्यासमोर
कोणी नतमस्तक होईल,
तर कोणी
स्वतःच्या सावलीपासून
दूर पळेल.
पण एकच प्रश्न
हवेत तरळत राहील —
“तुम्ही कोणाच्या बाजूला उभे होता?”
त्या क्षणापूर्वी,
स्वतःला ओळखा...
अन्यथा तो क्षण —
तुमच्या नकळतच
तुम्हाला उघड करेल.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २१/०५/२०२५ वेळ : ०७:४७
Post a Comment