कविता - सुवर्ण मृग
जर
सीतेच्या मनात
सुवर्ण मृगचं मोहक स्वप्न उगम पावत असेल,
तर
रामापासून दुरावणं
अटळच ठरतं...
मोह –
तो मृगजळासारखा भास,
डोळ्यांना भुलवणारा,
पण हृदयाला फसवणारा...
क्षणिक हव्यासातून
विरहाचं बीज रुजतं,
आणि
गहिरं प्रेमसुद्धा क्षणात विस्कटतं...
एका मोहाने शांत सत्त्व हरवतं,
साथ सुटते,
रेषा ओलांडली जाते,
आणि
हृदयाचे सेतू कोलमडून पडतात...
सुवर्ण मृग असो,
की हाव...
ज्याच्यामागे अंध धाव सुरू होते,
तिथे
प्रेमाला दिशा राहात नाही,
नि:स्वार्थाला ओळख मिळत नाही...
प्रेम हे समर्पण मागतं,
नियम नव्हे, संयम मागतं.
हव्यासाचं ओझं घेऊन
कोणतंही नातं चालत नाही...
म्हणूनच –
जर आयुष्यात ‘राम’ हवा असेल,
तर
‘सुवर्ण मृगा’च्या मोहात गुंतायचं नसतं...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/५/२०२५ वेळ : ०३:१५
Post a Comment