कविता - अक्षयतेचे सुवर्णपर्व
पहाटेच्या सोनसळी किरणांसारखी
मनाच्या गाभ्यात उतरते ही तृतीया—
क्षणभंगुरतेतही अक्षयतेचं स्मरण देणारी।
सण म्हणजे केवळ खरेदी नव्हे,
वैभवाचा झगमगाट नव्हे…
सण म्हणजे—
पावित्र्याचा प्रसाद,
सेवेचा संकल्प,
आणि सत्वशील आचरण!
लक्ष्मीचे पावन चरण
तिथेच पडतात—
जिथे मन असतं उदार,
आणि हात असतो देण्यास तत्पर।
परशुरामांच्या पराक्रमात
धर्मासाठी धार दिसते,
गंगेच्या लाटांमध्ये
संजीवन घडवणारी निर्मळता वाहते,
आणि मनही अनुभवतं पावित्र्याचा झरा।
युधिष्ठिरास लाभलेलं अक्षय पात्र
आपल्यालाही मिळू शकतं —
जर ओंजळ भरलेली असेल
सद्भावनेच्या थेंबांनी,
आणि उजळलेली असेल
समर्पणाच्या तेजाने।
आजचं सुवर्ण
कदाचित काळाच्या प्रवाहात क्षय होईल,
पण प्रेम, करुणा, नि:स्वार्थ सेवा—
ही मूल्यं
कालातीत अक्षय ठरतील!
म्हणूनच…
विशेष एक दिवस नको,
प्रत्येक क्षण असावा सात्त्विकतेचा,
सत्यतेचा साज लाभलेला।
पक्ष्यांना पाणी,
वृक्षांची सावली,
आणि माणसाला माणुसकीचा स्पर्श—
हाच खरा धर्म,
हीच खरी अक्षय संपत्ती!
आजची तृतीया सांगते—
दान कर… पण अंत:करणापासून।
हात पुढे कर… पण निर्व्याज हेतूने।
विचार कर… पण विवेकबुद्धीने।
‘अक्षय’ म्हणजे
जे काळालाही पार करतं,
जे क्षणभंगुरतेतही टिकून राहतं।
आणि प्रेम…
तेच तर अखंड, अढळ अक्षय असतं!"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३०/०४/२०२५ वेळ : ०५:३१
Post a Comment