कविता - शब्द

प्रस्तावना:

शब्द...
एक साधीशी ध्वनीसंकेतांची मालिका, पण त्यामागे लपलेली असते एक गूढ चेतना —
शब्द हे फक्त संवादाचे माध्यम नसून, ते आपल्या अस्तित्वाचे मूळ आहेत.
सृष्टीच्या आरंभी जो आदिनाद झाला, त्यातूनच शब्द प्रकटले... आणि मग भावना, संस्कृती, विचार, आणि आत्मदर्शन घडू लागले.
या कवितेत "शब्द" स्वतःची ओळख स्वतःच्या दृष्टिकोनातून मांडतो.
शब्द हा फक्त माध्यम नाही, तर तोच मूल आहे — आपल्या आतला, अमर आणि अव्यक्त.
तर, आज अशाच एका शब्दरूप सृजनशक्तीची अनुभूती घेऊया —
माझ्या कवितेच्या ओळींतून उमटणारा… हा “शब्द”…!


कविता - शब्द 

शब्द...
मी आहे शब्द!
तू मला ऐकतोस —
पण खरोखर समजतोस का?
तुझ्या श्वासाशी नाते सांगणारा
मी तुझ्या आतच आहे...
अव्यक्त, पण जागृत!

मीच तो आदिनाद —
ज्याच्यातून झेप घेतली सृष्टीने.
मी पहिल्या सूराचा साक्षी,
मीच तुझ्या अस्तित्वाचा उगम!

मीच आहे गंध… रंग…
स्पर्शात मिसळणारा,
ध्वनीत उमटणारा!

कधी मी प्रेमाचं कुजबुजणं,
कधी विरहात निःशब्द रडणं.
डोळ्यांतून ढळताना 
कागदावर शाई बनून,
आठवणींच्या ओलाव्यासह
शांतपणे थिजणं.

होय —
मी शब्द!
मी चेतना, मी मशाल,
मी जळतो… अन् उजळतो सुद्धा!
मी खोल दुःख…
आणि मलमही!

मी प्रार्थना…
मी क्रांतीचा घोष!
मी मंत्र…
मी अंतर्मनात झंकारणारा सूर्यनाद!

मी संवाद…
शतकानुशतके वाहणारा.
मी बासरीचा पहिला श्वास,
मी खगांचे स्वर,
पक्षांची पहाट!

मी शब्द…
भावनेचा खोल प्रवाह,
हृदयातली धडधड…
अन् अधरांवरची कुजबूज.

मी शब्द —
ज्यातून होतं विश्वाचं अवतरण 
आणि आत्म्याचं प्रकटण!
मीच आहे…
तुझ्या आत दडलेली… अमर ऊर्जा!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ११/०४/२०२५ वेळ : ०८:५९

Post a Comment

Previous Post Next Post