कविता - फक्त इतकंच सांग…
हे मृत्यो,
घेऊन जाताना थांब क्षणभर,
माझ्या अंतर्मनाची साद ऐक…
नको मोजू माझ्या पदव्या,
नको लावू यशाच्या मोजपट्ट्या,
फक्त इतकंच सांग—
आईच्या डोळ्यांत समाधान होतं का?
वडिलांच्या शब्दांत अभिमानाचा सूर होता का?
वाऱ्याच्या वेगाने धावलो आयुष्यभर,
स्वप्नांची क्षितिजं शोधली अविरत,
डोक्यावर त्यांचा आशीर्वाद,
पावलागणिक विश्वासाची साथ…
अडखळलो, कोसळलो,
पण पुन्हा उभा राहिलो!
हे मृत्यो,
त्या धडपडीला काही अर्थ मिळाला का?
सांग ना—
आईच्या कुशीत विसावलो तेव्हा
तिच्या मनाला निवांतपणा लाभला का?
वडिलांच्या खांद्यावर डोकं टेकताना
त्यांच्या हृदयात समाधान दाटलं का?
मी त्यांच्या श्रमांना न्याय दिला का?
त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी दिली का?
त्यांच्या काटेरी वाटांवर
आशेचं एखादं फूल तरी उमलवलं का?
हे मृत्यो,
निघण्याआधी फक्त एवढंच उमगू दे—
ते एकदा तरी म्हणाले का,
"ह्याच्यामुळे आमच्या जीवनाचं सार्थक झालं !"
कारण…
माझं कार्य मोजणारा काटा तुझ्याकडे नाही,
ती मोजदाद त्यांच्या नजरेनेच ते करतात!
हे मृत्यो,
घेऊन जाताना फक्त इतकंच सांग…
मी त्यांना थोडसं सुख देऊ शकलो का?
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०४/२०२५ वेळ : १६:३३
Post a Comment