कविता - एक शाश्वत श्वास
जिथे देहाचा प्रवास संपतो,
तिथे प्रश्नांची घाई सुरू होते—
काय शिल्लक राहतं?
हृदयाचे ठोके थांबतात,
पण आठवणींचा लोलक
झुलत राहतो
काळाच्या पटलावर...
डोळे मिटतात,
पण काही नजरांमध्ये
त्या डोळ्यांचं बोलणं उरून जातं.
ओठ थांबतात,
पण शब्द
मनामध्ये उरतात—
काही उगवत्या सूर्यकिरणांत,
तर काही चंद्राच्या प्रकाशात.
काय संपतं?
फक्त हा देह
एक आवरण
की त्याच्या आड दडलेली
अश्रूंची, स्मितांची, क्षमांची
न बोललेली ओळख?
...आणि त्या राखेच्या कुशीतूनच
उगम पावतो एक नि:शब्द विचार—
मी कोण होतो?
हे जीवन काय होतं?
उत्तर शोधताना
तोच प्रश्न
शांततेचं रूप घेऊन
प्रत्येक आठवण,
प्रत्येक चूक,
प्रत्येक क्षमा,
साऱ्या भावना
श्वासासम हळुवार
मनात विलीन करतो..
शेवटी सर्व प्रश्न शमतात...
उत्तर उरते फक्त एक अनुभूती—
जीवन हे केवळ श्वासांचं मोजमाप नव्हतं,
ते होतं —
दिवा होऊन दुसऱ्याच्या अंधारात उजळून जाणं.
आणि मृत्यू?
तो शेवट नसतो.
तो असतो एक क्षण—
जेव्हा अस्तित्व
स्वतःच्या मर्यादा ओलांडून
विधात्याशी एकरूप होतं.
...जिथे देह मागे राहतो,
आणि आत्मा —
नि:शब्द, निर्विकार,
पण गूढतेने परिपूर्ण —
साऱ्या आठवणांमध्ये विसावतो...
"मी होतो,"
आणि आता —
"मी आहे...
सर्वांमध्ये,
एक शाश्वत श्वास होऊन."
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०४/२०२५ वेळ : १८:२२
Post a Comment