कविता - मौनातील हाक

कविता - मौनातील हाक

शेवटच्या किरणांनी
माझ्या पापण्यांवर
एक स्मरण ठेवले आहे —
ते तुझंच आहे…
ओलसर, धूसर, अलवार…
माझ्या अस्तित्वाच्या किनाऱ्यावर
शब्दांनाही न उमगणाऱ्या स्पर्शासारखं.

हात पसरले मी
आभाळाच्या उसवलेल्या कुशीत,
पण ओठांवरून हरवलेले होते
सगळे शब्द, सगळे संवाद —
दगडासारखे, थंडगार,
अनुत्तर राहिलेल्या क्षणांसारखे.

एक शेवटचा पाऊस मागितला होता —
आतल्या आर्त तहानेसाठी,
पण आभाळही थकलेलं होतं,
त्याच्या डोळ्यांमध्येही
पाण्याच्या आठवणी सुकून गेल्या होत्या.

या जगाच्या कोलाहलात
मी केवळ एक श्वासांसारखा प्रतिसूर आहे —
मंद, अज्ञात,
तुझ्या अंतर्मनात गुंजणारा…
हाक नाही ती,
ती शांत स्मृती आहे —
आपल्या अधुऱ्या अस्तित्वाची.

जशी संध्याकाळ 
अंधाराच्या कुशीत शिरते,
तसाच मीही विरघळून जाणार आहे
क्षणांच्या ओलसर गाभाऱ्यात —
कुणाच्याच नजरेत न सामावता,
फक्त अंत:करणात ठसणारा.

माझं नाव…
माझं अस्तित्व…
एक कातर स्पर्श होऊन
तुझ्या अधरांवर विसावेल —
शब्दांशिवाय… सूरांशिवाय…
फक्त एक मौनातील हाक…
हळुवार... शांत... अनंत.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १८/०४/२०२५ वेळ : ०५:२२

Post a Comment

Previous Post Next Post