कविता - स्वप्नांचा प्रवास

कविता - स्वप्नांचा प्रवास

एक स्वप्न असतं...
जणू आत्मविश्वासाचा हिमालय —
शांत, स्थिर
आणि उंचावर नेणारं!

हे स्वप्न असतं विश्वासाचं,
मनातल्या निश्चयाचं,
हृदयातल्या समर्पणाचं!

क्षणाक्षणाला वाटतं —
या अफाट जगात 
आपण खूप लहान आहोत...
पण लहानसंच ते पाऊल
घेऊन जातं
सर्वोच्च शिखरावर!

शांतपणे रुजते ती भावना —
जणू मूक झाडासारखी,
मुळाप्रमाणे खोलवर गेलेली...
ती बोलत नाही,
पण सांगून जाते
शब्दांपलीकडचं काहीतरी!

जगणं म्हणजे केवळ
दिवस ढकलणं नव्हे —
ते असतं प्रत्येक क्षणात
एक नवा अर्थ शोधणं,
एक नवी उमेद जागवणं!

कधी एक छोटीशी कृतीही
आयुष्याला सुंदर वळण देते —
जणू तीच असते
आपल्या जीवनातला
एक सुवर्णक्षण!

कोण म्हणतं —
"जगणं म्हणजे फक्त असणं"?
खरंतर —
तो असतो एक सुंदर प्रवास,
स्वतःकडून स्वतःपर्यंतचा!

स्वप्न पाहणं पुरेसं नसतं,
ते अनुभवायचं असतं —
आणि जगणं समृद्ध करताना
प्रत्येक क्षणाला स्वतःला 
साकार करायचं असतं!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १२/०४/२०२५ वेळ : १६:५१

Post a Comment

Previous Post Next Post