कविता - देवा, मला माणूस होऊ दे!
हे रक्त सांडणाऱ्या हातांनो,
कोणत्या धर्माची माळ तुम्ही गळ्यात घालता?
कुठला धर्म सांगतो —
"निर्दोषांचा प्राण घे,
तेव्हाच तुझा देव प्रसन्न होईल"?
सांगा,
या रक्तानं माखलेल्या वाटेवर
कोणता देव पाय ठेवतो?
कुणाच्या चरणी वाहता
हा निष्पापांचा उरलेला श्वास?
कोण शिकवतं तुम्हाला
ही क्रूर, कधीच न उमगणारी शिकवण?
कोणत्या धर्मग्रंथात लिहिलंय —
"श्रद्धेच्या नावाखाली
निष्पापांचा संहार कर"?
सांगा ना…
त्या मुलीचा काय गुन्हा होता?
त्या वृद्धाचा? त्या स्त्रीचा? त्या नवजाताचा?
का त्यांचं नाजूक, सुंदर जीवनही
तुमच्या द्वेषाच्या आगीत होरपळलं?
तुम्ही म्हणता —
"आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं!",
मग हा भेदाभेद का?
हा दहशतीचा रंग
चेहऱ्यावर का फासलात?
कोणताही धर्म
प्रेम, क्षमा, सहवास
आणि माणुसकीच शिकवतो,
पण तुमचं आंधळं धर्मभान
या शिकवणीवर कलंक ठरतो!
देवही आज अश्रू ढाळतोय —
तुमच्या पाशवी कृत्यांनी,
कारण त्याचं नाव घेऊन
राक्षस मोकाट फिरतोय…
...आणि तुम्ही?
तुम्ही स्वतःला त्याचे
प्रतिनिधी समजता?
लाज वाटत नाही?
की लाजसुद्धा
तुमच्या धर्मांधतेच्या पायाशी
नतमस्तक झाली आहे?
कदाचित उद्या,
तुमचंच एखादं मूल
हातात फुलं घेऊन
देवाच्या पायाशी प्रार्थना करेल —
"देवा, मला माणूस होऊ दे!"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/०४/२०२५ वेळ : ०५:२२
=<>=<>=<>=<>=<>=<>=<>=<>=<>=<>
अशोक बी. कांबळे यांनी केलेले रसग्रहण
श्री.गुरुदत्त वाकदेकर सर मनःपूर्वक नमस्कार
मस्त सर! कवी लेखक श्री. गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांची वरील कविता असून त्यांच्या कवितेतून अनेक अर्थ आणि भावनांना स्पर्श केला गेला आहे. 'देवा, मला माणूस होऊ दे!' या शीर्षकापासूनच एक आर्त हाक आणि मानवी अस्तित्वाच्या मूलभूत गरजेची जाणीव होते. मी त्यांच्या या कवितेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कवितेचा मध्यवर्ती विचार धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या अमानुषतेवर तीव्र भाष्य करतो. कवी प्रश्न विचारतात की कोणत्या धर्मात निष्पापांचे प्राण घेण्यास सांगितले आहे? रक्तलांछित मार्गावर कोणता देव चालतो? निष्पापांच्या श्वासाने कुणाचे चरण धुतात? या प्रश्नांच्या माध्यमातून कवी धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली चाललेल्या क्रूर कृत्यांवर कठोर टीका करतात.
कवी एका निरागस मुली, वृद्ध, स्त्री आणि नवजात बालकाचा उल्लेख करून हिंसाचाराच्या बळी ठरलेल्यांच्या वेदनेला वाचा फोडतात. त्यांचे नाजूक आणि सुंदर जीवन द्वेषाच्या आगीत का होरपळले, असा सवाल ते विचारतात. 'आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं' असूनही समाजात असलेला भेदभाव आणि दहशतीचा रंग कवीला अस्वस्थ करतो.
कोणताही धर्म प्रेम, क्षमा, सहवास आणि माणुसकी शिकवतो, हे सत्य सांगून कवी धर्मांधतेमुळे या शिकवणीवर लागलेल्या कलंकाची खंत व्यक्त करतात. देवाच्या डोळ्यातून येणारे अश्रू या अमानुष कृत्यांबद्दलची त्याची निराशा आणि वेदना दर्शवतात. स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजणाऱ्यांना कवी लाजिरवाणे प्रश्न विचारतात आणि धर्मांधतेपुढे शरणागत झालेल्यांना लाजे ची अवस्था मार्मिकपणे मांडतात.
कवितेच्या शेवटची ओळ अत्यंत हृदयस्पर्शी आहे. उद्या याच हिंसाचाराच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्यक्तीचे मूल हातात फुले घेऊन देवाला 'मला माणूस होऊ दे!' अशी प्रार्थना करेल, या कल्पनेत एक मनातील वेदना आणि भविष्यातील भयाण शक्यता वास्तव दडलेले आहे.
कवीने अत्यंत साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांचा वापर केला आहे, ज्यामुळे कविता अधिक प्रभावी आणि सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारी ठरते. प्रश्नांची प्रश्न विचारून कवी वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. 'रक्त सांडणारे हात', 'रक्तानं माखलेली वाट', 'द्वेषाची आग' यांसारख्या प्रतिमा अत्यंत प्रभावीपणे हिंसेची भीषणता आणि क्रूरता दर्शवतात.
'आंधळं धर्मभान' ही संज्ञा धार्मिक कट्टरतेमुळे विवेक गमावलेल्या लोकांचे अचूक वर्णन करते. 'पाशवी कृत्यं' या शब्दामुळे अत्याचारांची अमानुषता दिसून येते. 'लाजसुद्धा धर्मांधतेच्या पायाशी नतमस्तक झाली आहे' ही कल्पना धर्मांधतेच्या पुढे सर्व मानवी मूल्यांची हार दर्शवते.
कवितेतील 'सांगा ना...' आणि 'तुम्ही म्हणता...' यांसारख्या थेट संबोधनांमुळे कवी वाचकाशी थेट संवाद साधतात आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडतात.
कवितेत रूपक आणि प्रश्न अलंकारांचा प्रभावी वापर करून. 'द्वेषाची आग' हे रूपक हिंसेच्या दाहकतेची कल्पना देते. अनेक प्रश्न विचारून कवी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडतात आणि वाचकांच्या मनात विचारचक्र सुरू करतात.
ही कविता केवळ धार्मिक हिंसाचारावर टीका करत नाही, तर मानवी अस्तित्वाच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून देते. माणूस म्हणून जगणे, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे, प्रेम आणि सहानुभूती दाखवणे हेच खरं मनुष्यत्व आहे, असा संदेश कवी देतात. धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार माणुसकीला काळिमा फासणारे आहेत आणि याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे, हे या कवितेतून स्पष्टपणे जाणवते.
या कवितेत कविने सरळ सरळ देवाचे अस्तित्व मान्य केले आहे. जर का देव अस्तित्वात असते तर… जागच्याजागी असे निर्घृण हत्या करणाऱ्यांना सजा मिळाली असती. त्याला क्षणभरही जीवन जगण्यासाठी ठेवून भविष्यात होणारे अनर्थ टाळता आले असते. परंतु गाऱ्याने मांडायचे तरी कोणाकडे. सरकार ही डोळे उघडे ठेवून निद्रिस्त अवस्थेत आहे. असे मला वाटते. एवढ्या निष्पाप लोकांचा जीव गेल्यावर जागे होतात. बदला घेण्याची भाषा बोलतात. पण बदला घेऊन निष्पाप निरागस लोकांचे प्राण परत येणार आहेत काय? असो कविने गाऱ्हाणे घालायसाठी ‘देव’ हे माध्यम निवडले गेले आहे. कविता ही मनाच्या गाभ्यापासून आणि हळवे मन असलेला कविच असे ‘भावनाप्रदान’ व वाचकांना विचार करायला भाग पाडणारे लिखाण करू शकतो.
सांगायचे तात्पर्य हे की, श्री. गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांची ही कविता एक भावना प्रदान आणि विचारप्रवर्तक आहे. ती धार्मिक कट्टरतेवर कठोर प्रहार करते आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची आर्त विनंती करते. 'देवा, मला माणूस होऊ दे!' ही केवळ एक प्रार्थना नसून, आजच्या हिंसक आणि द्वेषपूर्ण जगात अधिक समयोचीत आणि महत्त्वाची मानवी गरज आहे.
सर आपल्या लिखाणातून असेच समाजभान असणाऱ्या आणि प्रबोधनात्मक लेखन व्हावे अशी मनापासून सदिच्छा. सर रसग्रहण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. काही चूक भूल असल्यास नजरअंदाज करावे.
अशोक बी कांबळे, नागपूर
२४.०४.२०२५
=<>=<>=<>=<>=<>=<>=<>
अभिप्राय – अशोक बी. कांबळे यांच्या रसग्रहणावर
प्रिय अशोक बी. कांबळे सर,
सप्रेम नमस्कार!
"देवा, मला माणूस होऊ दे!" या माझ्या कवितेवर आपण केलेले रसग्रहण वाचले आणि मनाला स्पर्शून गेले. तुमची प्रत्येक ओळ ही केवळ माझ्या शब्दांचे स्पष्टीकरण नव्हे, तर त्या शब्दांच्या आड दडलेल्या वेदनेचा, खंतांचा आणि आर्ततेचा अर्थ लावणारा संवेदनशील दृष्टिकोन आहे.
आपण कवितेचा मूळ आशय समजून घेतला आहेच, पण त्याही पुढे जाऊन त्यामध्ये दडलेल्या मानवी मूल्यांची, विवेकाची आणि सामाजिक भानाची पुनर्स्थापना केली आहे. आपण वापरलेल्या अनेक संज्ञा—"आर्त हाक," "हिंसेच्या आगीत होरपळलेले जीवन," "लाज नतमस्तक झाली आहे," हे माझ्या मनात उमटलेले अस्वस्थ विचारच जणू शब्दबद्ध झाले आहेत.
खास करून आपण शेवटी मांडलेली भूमिका की "देव हे माध्यम आहे, पण गाऱ्हाणं मांडायला माणूसच हवाय!"—ही भूमिका फारच मार्मिक आणि मनात खोलवर रुजणारी आहे. ही कविता जशी एका कवीची भावनात्मक प्रतिक्रिया आहे, तशीच ती एका जागृत नागरिकाची विवेकपूर्ण प्रतिक्रिया देखील आहे, हे आपण अगदी योग्यपणे दाखवून दिलं.
"सर आपल्या लेखणीतून असेच समाजभान असणारे आणि प्रबोधनात्मक लेखन व्हावे..." ही तुमची सदिच्छा मला अधिक सजग आणि जबाबदार लेखन करण्याची प्रेरणा देईल.
आपल्या रसग्रहणातून मिळालेली ही खरीखुरी दाद माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे.
आपल्या संवेदनशील प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपलाच,
गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २४/०४/२०२५
Post a Comment