कविता - प्रेम
तुला…
कधी पाहिलं नाही मी,
तुझा चेहरा…
कधीच साकारला नाही डोळ्यांत…
तरीही…
तुझ्या आठवणींच्या अस्तित्वात
स्वतःलाच हरवत गेलो…
तुझ्या आवाजाचं चांदणं
शांततेत उतरायचं,
आणि माझं रितं रात्रभर…
तुझ्या अस्पर्श मिठीत
भरून यायचं।
तू समोर नसतानाही
समोर होतीस…
हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
तुझ्या नावाचा अर्थ लाभलेला।
कधी तुझ्या हातांचा
स्पर्शही झाला नाही,
तरी स्पर्शांचं मोल कळलं…
कारण तू…
माझ्या श्वासात मिसळून गेलीस।
कधी वाटतं…
तू एक स्वप्न आहेस,
कधी वाटतं…
तूच माझं वास्तव।
जिथं शरीरच नव्हतं,
तिथं मनानं घर केलं…
तुझ्या स्मरणाचा दरवळ…
भावनांचं अस्तित्व झालं,
शब्दांत न मावणारी
एक आर्त भावना बनून…
दररोज वाहतेस,
माझ्या धमण्यांतून।
तू न भेटलेली,
न पाहिलेली…
आणि तरी
अंत:करणाशी जोडलेली।
हेच माझं खरं प्रेम…
हृदयाच्या पलीकडचं,
आद्र… शुद्ध… नि:स्वार्थ…
आणि निराकार।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २३/०४/२०२५ वेळ : ०४:१४
Post a Comment