कविता - स्वतःचा सर्वोत्तम साज
कधीतरी...
दर्पणासमोर उभं राहताना
स्वतःलाच विचारावंसं वाटतं –
“खरंच, मी कोण आहे?”
दिसतो तो चेहरा –
अनेक मुखवट्यांच्या आड हरवलेला,
इतरांच्या अपेक्षांनी रंगवलेला,
पण… स्वतःसाठी?
एक निपचित, नि:शब्द पोकळी.
शब्द...
मनाच्या अंधाऱ्या गुहेत अडकलेले,
अश्रू...
घन पावसासारखे डोळ्यांतच थिजलेले,
आणि तरीही, खोल कुठेतरी
एक शांत, पण ठाम स्वर कुजबुजतो –
"उठ... ऊभा रहा...
स्वतःला ओळख –
कारण तू अजूनही पूर्णत्वाच्या वाटेवर आहेस!"
तू आहेस एक अपूर्ण कविता,
जिच्या प्रत्येक ओळीत
अनुभवांचे अर्थ अलगद उमलत आहेत,
तू आहेस एक निरंतर वाहणारी जीवनधारा,
जिचा संबंध –
स्वतःचं खरंखुरं तेजस्वी अस्तित्व आहे.
म्हणूनच –
काट्यांतून चालताना सुगंध दरवळव,
भीतीच्या धुक्यात स्वतःचा दीप उजळव,
अपयशाच्या राखेतून आत्मतेज साकार.
कारण 'सर्वोत्तम तू'
हा शोध तुलाच घ्यायचा आहे –
शब्दांविना, पण प्रकाशमान!
स्वप्नं पहा…
पण अंतःदृष्टीच्या नेत्रांनी,
प्रेम कर…
पण स्वतःच्या अस्तित्वाशी बिलगून.
आणि दररोज नव्या उषःकालासारखा –
'स्वतःचा सर्वोत्तम साज'
नव्यानं परिधान कर...
संपूर्ण जग उजळवणारा,
तूच स्वतःचा सूर्य हो!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/०४/२०२५ वेळ : ११:११
Post a Comment