कविता - पुस्तक - माझं अंतरंग
(पुस्तक दिनानिमित्त)
जेव्हा मनात उसळतात वादळं,
आणि दिनचर्येच्या गोंधळात हरवतो,
तेव्हा तू – माझं पुस्तक –
शांततेचा निःशब्द किनारा होतोस.
तू हळूच हातात येतोस,
जणू खांद्यावर हात ठेवतोस,
तुझ्या शब्दांमधून चालताना
मी माझ्याच आत उतरतो.
तू केवळ पानांचा नाहीस गठ्ठा,
तू आहेस अनुभवांचा अथांग सागर,
कधी गुरू होऊन शिकवतोस,
कधी सखा होऊन समजावतोस.
तुझ्या प्रत्येक शब्दात असतो
एक नवा दृष्टीकोन, एक नवा श्वास,
कधी हलवतोस विचारांच्या वावटळीने,
कधी भावनांच्या कुशीत निजवतोस.
तुझ्यासवे रात्र चांदण्यांत उजळते,
आणि पहाट आशेच्या किरणांनी फुलते,
तू नसला की मात्र,
माझेच अस्तित्व हरवते.
मनाच्या चंचलतेला
तू स्थैर्याचं घरटं बहाल करतोस.
वाट चुकलेल्या पावलांना
दिशा नव्हे – साक्षात ध्येय देतोस!
तुझ्या सोबतीनं
मी शब्दशः उभा राहतो,
निर्भय, सजग, आणि सजीव होतो –
कारण तू माझं आत्मभान होतोस.
तू आहेस उष्णतेत थंडावा,
तुटलेल्या नात्याची उरलेली उब,
मूक अश्रूंमध्ये
तूच असतोस स्पष्ट शब्द, आवाज!
आज, या पुस्तक दिनी
मनःपूर्वक तुला वंदन करतो.
आणि जर जन्म पुन्हा लाभला,
तर तुझ्यासारखंच पुस्तक –
जीवनभर वाचत, समजत, अनुभवत जगावं,
हीच प्रांजळ प्रार्थना करतो!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०४/२०२५ वेळ : ०९:२२
Post a Comment