कविता - आशेचा दिवा
अंधाराच्या गहिरेपणात
आशेचा दिवा तेवत ठेव,
वादळं झेप घेतील, तरीसुद्धा
मनाच्या तळाशी दिलासा विसावू दे.
भले मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून पडतील,
तरी लवचिक गवत सहज मार्ग शोधेल,
शांतपणे, नम्रतेने,
ते स्वप्नांपर्यंत हसत पोहोचवेल.
आकांक्षा असो आकाशाएवढी,
तरी मनावर अपेक्षांचं नको ओझं,
क्षण छोटा, पण गर्भात पहाट ठेवतो,
आशेची नवी चाहूल देतो...
तुझ्या धीरातून मिळते नवी चेतना,
आणि स्पर्शातून आशेची नवी वाट,
जिथे प्रत्येक अडथळा
ठरतो पायरी... उंच झेपेची.
संकटांना सामोरं जा हसतमुखाने,
स्वतःला अखेरपर्यंत झोकून दे,
परिश्रम, श्रद्धा आणि आत्मविश्वास
हेच होतील तुझे तेजस्वी अस्त्र
जे कधीच मावळू देणार नाही
‘आशेच्या दिव्या’चं अखंड तेज.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०४/२०२५ वेळ : ०५:०८
Post a Comment