कविता - विजेचा तांडव...
(आकाशीय विजेच्या आपत्तीवर आधारित)
वाऱ्याच्या सुसाट झंझावातात
आकाश कधी काळंठिक्कर झालं...
कळलंच नाही!
हळूहळू सरकत होतं संकटाचं सावट—
आणि... क्षणात धगधगला वीजेचा अंगार!!
ती फक्त वीज नव्हती—
ती होती आकाशाच्या क्रोधाची
लालभडक, जळजळीत जिव्हा!
धरतीवर नाचणारा एक अनावर तांडव,
जीवनाच्या निसरड्या रेषांवर
नाचवणारी काळाची तलवार!
शेतीमधल्या उगवत्या धारणांवर
ती आदळते... छिन्नविछिन्न करते!
शेतकऱ्याच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू
पावसात मिसळूनही काळजात धग धरतात...
गावकुसाबाहेर गवतावर विसावलेली झोप,
अन् त्या झोपेवर आदळणारा एक आकस...
क्षणात शांततेचा मृत्यू होतो,
नि निसर्गाच्या नखरेलपणाची
किंमत माणसाला चुकवावी लागते!
ही वीज केवळ आकाशातून पडत नाही...
ती पडते माणसाच्या आशेवर, स्वप्नांवर!
कधी गोठ्यात, कधी घरट्यांवर,
तर कधी कोवळ्या पावलांवर...
चालत असलेल्या वाटांवर!
हे निसर्गा—
इतका क्रूर नकोस होऊ...
तुझ्या कुशीत विसावण्याची
ती आस... अजूनही हृदयात धडधडते.
तुझ्या रागात होरपळलेली माणुसकी वाचव—
नि दे प्रकाश...
पण जाळून न टाकणारा!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/४/२०२५ वेळ : ०६:०३
Post a Comment