कविता - मी शब्दांना आग लावली…
(सुरेश भटांना आदरांजली – मुक्तछंद कविता)
“मी शब्दांना आग लावली…
मी वाऱ्याला शपथ घातली…”
या केवळ ओळी नव्हत्या,
त्या प्रत्येक अक्षरात धग होती –
तुमच्या शब्दज्वाळेची!
तुम्ही लिहित होता अन्,
शब्द सांडत होते रक्तासारखे…
क्षणाक्षणाला लढत होता
एक अदृश्य युद्ध – शब्दांच्या रणभूमीवर!
तुमच्या लेखणीच्या टोकावर
लागली दुःखाची ठिणगी,
आणि उमलली गझल –
जखमांवरची कमळं होऊन!
“मी अंतरीची कविता लिहिली…”
म्हणताना,
तुम्ही अंतरंग फाडून दाखवलं,
शब्दांना फुंकर घालून,
आकांक्षांना अर्थ दिलात.
तुमचा प्रत्येक शेर
झाला एक ताजमहाल –
जिथे वेदना संगमरवरी उभी,
आणि तुमच्या सूरांची झळाळी
देते तिला तेज.
तुम्ही गेले नाहीत…
तुम्ही शब्दांमध्ये विरघळलात.
जिथे कोणी ओठ उघडतो,
तिथे तुमचा शेर झंकारतो,
जिथे एखादा जीव तगमगतो,
तिथे तुमची गझल श्वास बनते.
तुम्ही 'भट' नव्हता,
तुम्ही होतात अग्निहोत्र –
ज्यातून गझल जन्म घेते,
आणि काळालाही अर्थ गवसतो.
तुमच्या शब्दांनी
निराश मनांना दिलं होतं
एक विश्वासाचं पंख…
“उधारलेल्या श्वासावरती…”
जगण्यासाठी आशेचा रंग.
आज…
आम्ही लिहितो गझल –
तुमच्याच राखेतून उगवलेल्या उषेप्रमाणे.
प्रत्येक शेरात आहे
तुमच्या अस्तित्वाचं तेज –
अंधारातही न लोपणारं!
एक दिवस असा येईल,
की तुमचे शब्द –
काळाच्या सीमेपलीकडेही
झंकारत राहतील!
कारण तुम्ही गेले नाहीत…
तुम्ही “अमर” झालात –
शब्दांमधून, श्वासांमधून, गझलांमधून…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १५/०४/२०२५ वेळ : २२:४५
Post a Comment