कविता - संघर्षाचा सूर्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दगडासारख्या पाषाणहृदयी
समाजात जन्म घेतला...
पण काळजात होती चेतनेची ज्वाळा!
शिकणं नव्हतं गुन्हा,
पण गुन्हेगारासारखी शिक्षा मिळाली!
तरीही तो वाचत राहिला!
शिकत राहिला!
लढत राहिला!
हसत राहिला!
कारण त्याचं स्वप्न मोठं होतं...
माणसामाणसांत त्याला
समतेचं राज्य निर्माण करायचं होतं!
पाण्याच्या घागरीत त्याला तिरस्कार सापडला...
प्रत्येक पायरीवर अडथळा उभा राहिला...
पण त्यानं आत्मा विकला नाही,
समतेचं स्वप्न उराशी घट्ट धरून ठेवलं...
लंडन, कोलंबिया आणि संपूर्ण जग म्हणालं –
"हा महामानव आहे!"
त्याच्या बुद्धिमत्तेला सन्मान देत होते!
पण भारतात मात्र –
‘अस्पृश्य’ म्हणून लचके तोडले जात होते!
लेखन होतं त्याचं शस्त्र,
आणि संविधान होतं त्याचं रणांगण!
धर्मांतर नव्हतं बंड,
तर होती ती त्याच्या आत्मसन्मानाची उद्घोषणा!
"शिका... संघर्ष करा... संघटित व्हा!" –
ही त्याची शिकवण आजही मनात नवं बळ निर्माण करते...
तो केवळ मावळला नाही,
तो शांतपणे अनंतात विलीन झाला...
पण त्याचं तेज
आजही लाखो मनांत क्रांती चेतवतंय!
बाबासाहेब – संघर्षाचा सूर्य,
अन्यायच्या अंधारावर त्यानं
प्रकाशाची किनार चढवली!
जो उगवला... आणि
कधीच मावळला नाही!
@गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १३/०४/२०२५ वेळ : ०१:०३
Post a Comment