कविता - माझ्या अस्तित्वाच्या कुंकवाने...
माझ्या अस्तित्वाच्या कुंकवाने
तिचं कपाळ सजावं,
हळवी झुळुक होऊन,
तिच्या लटांशी खेळावं...
तिच्या डोळ्यांत उमलावा
प्रेमाचा संधिप्रकाश,
शब्द उतावीळ होताना,
न बोलताही गुंतावेत श्वास...
तिच्या हसऱ्या ओठांवर
माझा सूर अलगद यावा,
शब्दांआधी स्पंदनांनी,
थेट सांगावा धाडावा...
मृदू पावसाचा स्पर्शगंध
तिच्या मनी दरवळावा,
अन् आठवणींच्या क्षणांनी
काठ पापण्यांचा गाठावा...
माझ्या अस्तित्वाच्या कुंकवाने
तिच्या भाळी चंद्र सजावा,
आणि त्या चंद्रप्रकाशात
माझ्या प्रीतीचा चंद्र हसावा...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०३/२०२५ वेळ : १६:५२
Post a Comment