कविता - फक्त आठवण येईल माझी...

कविता - फक्त आठवण येईल माझी...
 
कधीतरी अनाहूतपणे, 
स्मृतींच्या संध्याछायेत 
हळवी झुळुक स्पर्शून जाईल, 
आणि मनाच्या पानावर 
गहिऱ्या आठवणींचे शब्द उमटून जातील...
एखाद्या शांत दुपारी, 
सावलीत विसावलेला एकटेपणा 
हळुवार कुशीत घेईल तुला, 
आणि नकळत डोळ्यांच्या कडांवर 
आठवणींचे थेंब साठतील...
त्या ओल्या क्षणांत, 
हसवणारे, रुसवणारे, 
गडबड करणारे, 
गुपचूप नजरेतून बोलणारे क्षण 
हळूहळू तुझ्या अवतीभवती 
कुंपण घालतील...
तुझ्या अंगणातली मोगऱ्याची कळी 
जेव्हा दरवळू लागेल, 
तेव्हा तिच्या मंद सुवासातून 
माझ्या अस्तित्वाचा अंश दरवळेल, 
आणि तू सहजच मागे वळून पाहशील...
हळुवार स्पंदनासारखी,
स्मृतींच्या गंधात विरघळणारी,
मनाच्या अस्वस्थ किनाऱ्यावर
लाटेसारखी येणारी...
फक्त आठवण येईल माझी...

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २९/०३/२०२५ वेळ : ०६:४४

Post a Comment

Previous Post Next Post