अनुज केसरकर यांच्या ‘कायशार’ कवितेचे रसग्रहण
अनुज केसरकर हे कवितेच्या प्रत्येक अक्षरात स्वतःला शोधणारे, अनुभवणारे आणि व्यक्त करणारे कवी. त्यांची कविता म्हणजे एका वेगळ्या भावविश्वाची सफर, जिथे शब्द फक्त उच्चारले जात नाहीत तर त्यांचा स्पंदनांमधून प्रत्यय येतो. ‘कायशार’ ही कविता त्यांच्या सर्जनशीलतेचे एक प्रभावी उदाहरण आहे.
‘कायशार’ ही कविता वैराग्य आणि आसक्ती, मोह आणि मुक्ती यांच्या संघर्षाचे रूपक आहे. माणसाच्या मनात कायम द्वंद्व सुरू असतं — एक बाजू संसाराच्या मायेने ओढली जाते, तर दुसरी बाजू विरक्तीच्या शांततेकडे आकर्षित होते. ही कविता त्या द्वंद्वाचे प्रतिबिंब आहे.
कवितेची सुरुवात चांदण्यात पहुडलेल्या एका वैराग्याने होते. पण हा वैरागी खरोखर मुक्त आहे का? त्याच्या हातांवर हात असले, तरीही त्याची अवस्था मोकळी आहे का? हा प्रश्न कवितेच्या पहिल्याच ओळींमध्ये उमटतो.
चांदण्यात पहुडले,
वैरागी कोणी
मोकळे हातावर,
हात दोन्ही..
इथे वैराग्य आणि मोह एकाच वेळी अस्तित्वात आहेत. वैराग्य आहे, पण तरीही एकतरी बंध उरला आहे. हीच मानवी स्वभावाची विडंबना आहे, त्याला मुक्ती हवी असते, पण तो मोहाच्या ओलाव्याला धरून ठेवतो.
अनुज यांच्या कवितेतील प्रतिमा अत्यंत जिवंत आणि अर्थपूर्ण आहेत. त्यांची शब्दकळा साधी असूनही ती खोलवर जाऊन भिडते.
या ओळींमध्ये आध्यात्मिक अस्वस्थता स्पष्ट होते. स्मशान ही मृत्यूची, समारोपाची जागा, तर मंदिर म्हणजे श्रद्धेचे, भक्तीचे स्थान. पण येथे मंदिर "फोडलेले" आहे आणि देव "क्षितिजावर" गेला आहे. याचा अर्थ हा केवळ लौकिक जीवनाचा शेवट नाही, तर विश्वास आणि अस्तित्वाच्या संकल्पनांचा भंग आहे.
तू दिलेली,
संभोगाची सुकुमार भूल
देहावर माखली,
अफाट चाखण धूळ....
ही ओळ माणसाच्या इंद्रियसुखाच्या अनुभवाचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या मोहाच्या क्षणाचे चित्रण करते. शरीराच्या आनंदाची माया क्षणिक असते, पण तिच्या स्मृती धुळीसारख्या शरीरावर रेंगाळत राहतात.
कवितेच्या पुढील ओळी आत्मशोधाच्या प्रवासाची वेदना व्यक्त करतात —
दूर झरीतून,
पाझरे...
अजूनही कैफियतीचा अभंग
जाणवे उरात,
धगनग्न,
कोरलेला दुभंग....
येथे अंतर्मनातील विसंगती आणि वेदना अधोरेखित होते. "कैफियतीचा अभंग" म्हणजे विचारांच्या ओघात वाहणारा अंतर्गत संघर्ष, तर "धगनग्न, कोरलेला दुभंग" ही आत्म्याच्या फुटलेल्या, विभागलेल्या अवस्थेचे प्रतीक आहे. माणूस आपल्या पलीकडच्या शोधात असतो, पण त्याच्या आतच इतकी गोंधळलेली अवस्था आहे की, तो स्वतःच्या अस्तित्वाचे तुकडे गोळा करून आणू शकत नाही.
कोणी धरावे कोणासाठी,
प्राणांचे अंतिक धरण
चंदन पेटवून जळते,
अज्ञात जाईजुईचे सरण...
या ओळीत मानवी नात्यांतील अस्थिरता आणि अंतिम सत्य म्हणून मृत्यू यांचे अत्यंत गूढ आणि संवेदनशील चित्रण आहे. "कोणी धरावे कोणासाठी" हा प्रश्नच मुळी माणसाच्या अस्तित्वावर एक गंभीर भाष्य करतो. आपण जीवनभर कोणासाठी तरी जगतो, कोणाचातरी आधार शोधतो, पण शेवटी प्रत्येकाला आपापली वाट एकटीच चालायची असते.
"प्राणांचे अंतिक धरण" या ओळीत जीवनाचा शेवट आणि अंतिम श्वासाच्या क्षणातील असहाय्यता दिसते. कोणीच कोणासाठी अखेरचा आधार होऊ शकत नाही, कारण शेवटी जीवनाचा प्रवास वैयक्तिक असतो.
"चंदन पेटवून जळते" ही प्रतिमा अत्यंत प्रभावी आहे. चंदन हे पवित्रतेचे आणि शुचिता दर्शवणारे असते. माणसाच्या जीवनातील भावना, नाती, प्रेम सर्व काही या चंदनासारखे सुगंधी असते, पण अखेरीस ते जळून नष्ट होते.
"अज्ञात जाईजुईचे सरण" या ओळीत विलक्षण वेदना आहे. जाई आणि जुई या दोन्ही फुलांचा गंध अत्यंत मोहक आणि कोमल असतो, पण येथे तो 'सरण' म्हणजे चितेसाठी वापरला जात आहे. याचा अर्थ जीवनातील सुंदर, नाजूक क्षणही शेवटी अंताच्या प्रक्रियेत समाविष्ट होतात. ही अत्यंत कारुण्यमय आणि गूढ प्रतिमा आहे, जिथे जीवनाच्या अस्थिरतेला सूक्ष्म आणि सौंदर्यपूर्ण शब्दांनी पकडले आहे.
मृग घेऊन ऊरी,
नेमका पाऊस
दारी पडलेला
पूर वाहे पुरात,
जोगीया नदीभर,
रडलेला....
हे कडवे आध्यात्मिक अस्वस्थता आणि मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेचे प्रतीक आहे. "मृग घेऊन ऊरी" या ओळीत मृगजळाचा संदर्भ आहे. मृग (हरिण) सदैव जलाशयाच्या शोधात भटकत राहतो, पण त्याला त्याच्या आतच असलेल्या कस्तुरीचा गंध समजत नाही. हे रूपक माणसाच्या आत्मशोधाच्या प्रवासावर भाष्य करते. तो बाहेर सुख शोधतो, पण त्याचे खरे अस्तित्व त्याचे सूख त्याच्या आतच असते.
"नेमका पाऊस दारी पडलेला" ही ओळ जीवनात संधी येण्याच्या क्षणाचे प्रतीक आहे. पाऊस हा तृप्ती आणि समाधान देणारा असतो, पण तो "नेमका" दारी पडतो याचा अर्थ कवीला सुखाच्या अत्यंत जवळ गेल्यानंतरही त्याचा संपूर्ण लाभ घेता येत नाही.
"पूर वाहे पुरात" या ओळीत अनियंत्रित भावनांचा प्रवाह दिसतो. नदीला पूर आला की ती आपल्या सीमारेषा ओलांडून वाहते, तशीच माणसाच्या मनातील अस्वस्थता कधी कधी त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर जाते.
"जोगीया नदीभर, रडलेला..." येथे "जोगी" म्हणजे संन्यासी, जो साधना आणि वैराग्याच्या मार्गावर आहे. पण हा जोगी रडतो आहे. यात एक विसंगती आहे. जो वैरागी आहे, तोही दुःखी आहे. याचा अर्थ त्याला जीवनातील आसक्तीपासून मुक्त होता आले नाही.
कवितेचा शेवट आणि भावनांची पराकाष्ठा
तिच्या रानोमाळ,
चांदण फिरते राई
बैचेन तळ्यावर,
राख पसरूनं आई.....
कवितेचा शेवट एका गूढ आणि खोल जाणिवेच्या प्रतिमांनी होतो. "रानोमाळ चांदण" ही अस्तित्वाच्या विसाव्याची प्रतिमा आहे, तर "बैचेन तळ्यावर राख पसरलेली आई" ही वात्सल्य, निर्व्याज प्रेम आणि त्याच्या अस्तित्वाची आठवण करून देणारी प्रतिमा आहे.
ही शेवटची ओळ कवितेला एका खोल, हळव्या जागी नेऊन ठेवते. शरीराच्या, भावनांच्या आणि विचारांच्या संघर्षानंतरही, माणसाच्या मनाच्या गाभ्यात एक निवांततेची ओढ असते. जशी तळ्याच्या काठावर बसलेली आई, काळ्या रात्रीच्या प्रकाशात शांततेच्या शोधात असते, तशीच ही कविता आपल्यालाही त्या शोधाच्या वाटेवर नेते.
‘कायशार’ ही कविता केवळ शब्दांचा खेळ नाही, तर ती एका तत्त्वचिंतनाचा भाग आहे. ही कविता मानवी जीवनातील मुख्य संघर्ष, आसक्ती आणि वैराग्य यांच्यातील द्वंद्व मांडते. ती आत्मशोधाच्या प्रवासाचे आणि मनाच्या गूढतेचे प्रतिबिंब आहे.
अनुज केसरकर यांच्या कवितेची जादू हीच आहे की, ती वाचकाच्या मनात खोलवर रुजते. ती शब्दांच्या कक्षा ओलांडून भावनांचे आकाश व्यापते. ‘कायशार’ ही कविता म्हणजे मुक्तीच्या शोधात असलेल्या एका अशांत मनाचा अविष्कार आहे. जिथे देह, आत्मा, भोग, मोह, विरक्ती आणि मुक्ती यांचे अव्यक्त तरंग एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत.
©रसग्रहण : गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०३/२०२५ वेळ : ०२:०४
Post a Comment