१६/०३/२०२५
कविता - वात्सल्याचा पदर
आई...
हा एकच शब्द जेव्हा ओठांवर येतो,
तेव्हा काळजात कुठेतरी उबदार प्रेमाचा झरा वाहू लागतो.
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे ममतेचा गंध,
आई म्हणजे अस्तित्वाचा धागा,
जीवनाच्या चहू बाजूने गुंफलेली एक मायेची सावली!
पहिल्यांदा गिरक्या घेणाऱ्या लेकराला
आपल्या मिठीत घेत म्हणणारी तीच,
“घाबरू नकोस बाळा, मी आहे ना!”
पहिल्या शब्दांना, अडखळत्या पावलांना
शब्दांची ओढ लावणारी तीच,
पहिल्या वेदनांना आपल्या ममतेच्या हातांनी
गोंजारणारी तीच— आई!
माणसाच्या प्रत्येक जन्माला मिळणारी हीच एक देणगी,
ईश्वराच्या हस्ताक्षराने लिहिलेला प्रेमाचा शाश्वत ग्रंथ.
कधी अंगाईसवे झुलवणारी,
तर कधी डोळ्यांच्या आसवांना पदराने टिपणारी,
आई म्हणजे त्या परमसुखाचा पदर,
जो जगातील कोणत्याही राजस सिंहासनाहून अधिक मऊ आणि उबदार!
आईच्या वात्सल्याच्या मखमली पदराखाली
शब्दही निवांत होतात, गाणी उमलतात,
मृदु हास्य फुलते आणि दुःख विरघळून जातं.
तिच्या कुशीत विसावणाऱ्या क्षणांना
स्वर्गाची सुवासिक झालर असते.
आज, मातोश्री गं.भा. शालिनी तुकाराम पाटील (आक्का)
यांच्या स्मृतीस अभिवादन करताना,
त्यांच्या वात्सल्याचा सुगंध अजूनही दरवळतो आहे.
त्यांच्या मायेच्या सावलीत विसावलेले क्षण,
आजही मनाच्या आरशात स्पष्ट उमटतात.
आई... तुझ्या प्रेमाची उतराई कसा होऊ?
तुझ्या स्पर्शाच्या उबेची तुलना कशासोबत करू?
तू गेलीस तरी तुझ्या आठवणींचा पदर
आमच्या आयुष्यावर मायेची गोधडी बनून पांघरला आहे.
तू असशील तिथेही अशीच प्रकाशमान असशील,
आमच्या प्रार्थनांमध्ये, आठवणींमध्ये आणि आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये!
"आईच्या स्मृतींना नमन...!"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०३/२०२५ वेळ : १८:१४
Post a Comment