कविता - नंदनवन

कविता - नंदनवन

चाळ होती अंगण आमचे,
शेजारी होते आप्तांसारखे,
दारं उघडी, मनं उघडी,
सारेच कसे झर्‍यासारखे.

गोंगाटातही माया होती,
हसणं-रडणं एकच होतं,
मायेच्या ओलाव्यानेच,
नातं निखळ टिकत होतं.

गणपती, होळी, दिवाळीला,
सण नाही उत्सव व्हायचा,
कानात सनई वाजायची,
अन् चंद्र अंगणी उतरायचा.

आनंदाची शाळा भरायची,
चाळ सारी नाचायची,
जणू एकाच कुटुंबाची,
दारी रांगोळी सजायची.

भाळी लावत हळदीकुंकू,
स्नेह ओसंडून वाहायचा,
रंग एकत्र उधळताना,
नातं अधिकच खुलवायचा..

दुःख असो वा सुखाच्या गाठी,
आपुलकीचा हात असायचा,
दार न वाजवता स्वयंपाकघरात,
थेट मायेचा ओलावा दिसायचा.

प्रेमाची ऊब द्यायला,
शेजारीपाजारी धावायचे,
पाठीवरून हात फिरवताना,
डोळ्यांत आसवं दाटायचे.

पण काळ बदलला, चित्र बदलले,
चाळीत हरवले ते सोनेरी क्षण,
फ्लॅटच्या बंद दरवाज्यांनी,
मनांभोवती बांधले कुंपण.

सण आले तरी दरवाजे,
आता कोणासाठी नाही उघडत,
माणसं आहेत तिथेही,
पण मन नाही जुळत.

गणपती बसतो कोपऱ्यात शांत,
घरीदारी गजबजाट नाही,
मनात ना नात्यांची चाहूल 
होळीच्या रंगांतही माया नाही.

ओवाळणीतली ऊब हरवली,
भिंतींआड मनं कोमेजली,
दिवाळीच्या पणत्या पेटल्या,
तरी वात एकटीच रडली.

मायेचा तो उबदार शिडकावा,
चला पुन्हा ह्रदयी जागवूया,
संस्कृतीचा तो सुंदर वेल,
घराघरांत नव्याने लावूया.

पण अजूनही शक्य आहे,
नाती नव्यानं उलगडणं,
फ्लॅटच्या भिंतींआड लपलेलं,
प्रेमाचं नंदनवन फुलवणं.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १५/०३/२०२५ वेळ : ०३:५१

Post a Comment

Previous Post Next Post