कविता - अज्ञात क्षितिज
जरी मांजा असला माझ्या हातात
तरीही मनात कसलीही शंका न ठेवता
तू मुक्तपणे विहरत जा आकाशात
पतंगासारखं
तू भरारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे
आज जरी तुला
बंधन वाटत असलं तरी
तुझ्या हितासाठीच
हा मांजा
मी धरलाय घट्ट
तुझ्या रक्षणासाठी
तुझ्या कल्याणासाठी
योग्यवेळी देईन ढील सूट
तुला स्वच्छंदीपणे
नभांगण पालथं घालण्यासाठी
जीवनाच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करताना
मी तुझ्या पंखांखाली स्थिर वारा म्हणून असेन
तुला अधिक वर
आणि सुरक्षित घेऊन जाण्यासाठी
तुझ्या पंखांना बळ देईन
तुला तुझा स्वतःचा मार्ग आखण्यास,
शोधण्यास सक्षम बनवताना
तुझ्या स्वप्नांच्या अज्ञात क्षितिजाला
स्पर्श करण्यासाठी
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०९/०२/२०२५ वेळ : ०६:१२
Post a Comment