लेख - शून्यातून उभारलेलं साम्राज्य: भागोजी कीर यांचा प्रेरणादायी प्रवास


लेख - शून्यातून उभारलेलं साम्राज्य: भागोजी कीर यांचा प्रेरणादायी प्रवास

भागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ ते २४ फेब्रुवारी १९४१) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.

भारतीय इतिहासात काही व्यक्तींची नोंद त्यांच्या अविरत परिश्रम, कर्तृत्व आणि समाजसेवेच्या कार्याने अमर होते. अशाच एका महान विभूतीचं नाव म्हणजे भागोजी कीर. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी केवळ संपत्ती मिळवली नाही, तर समाजासाठी अनमोल योगदान दिलं. त्यांच्या जीवनप्रवासावर दृष्टिक्षेप टाकला तर ते केवळ उद्योजक नव्हते, तर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि प्रामाणिकतेचा आदर्श होते.

१८६७ मध्ये रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यातील एका गरीब कुटुंबात भागोजी कीर यांचा जन्म झाला. आई लक्ष्मीबाई धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीच्या होत्या, तर वडील बाळोजी कीर शेतमजूर होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लहान वयातच भागोजींनी सोनचाफ्याची फुलं आणि उंडणीच्या बिया विकून शिक्षणाचा खर्च भागवला.

त्यांच्या मनात शिक्षणाची जाणीव लहानपणापासूनच होती, पण परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अपूर्ण ठेवावं लागलं. मात्र, गरिबीने त्यांची महत्त्वाकांक्षा रोखली नाही.

बाराव्या वर्षी भागोजी कीर मुंबईत आले. खिशात दमडीही नव्हती, पण स्वप्न मोठं होतं. एका सुताराच्या वर्कशॉपमध्ये रंधा मारण्याचं काम मिळालं आणि दिवसाला दोन आणे मिळायला लागले. परंतु भागोजी केवळ मजूर नव्हते, ते जन्मजात उद्योजक होते. लाकडाचा भुसा जाळण्यासाठी फेकला जात असे. त्यांनी मालकाची परवानगी घेऊन तो भुसा विकायला सुरुवात केली आणि त्यातून अधिक पैसे मिळवले. याच कल्पकतेमुळे त्यांच्यातील उद्योजकाची पहिली ठिणगी दिसून आली.

मुंबईत भागोजी कीर यांना शापूरजी पालनजी मिस्त्री या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची साथ मिळाली. पालनजींनी भागोजींच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी लाकडाच्या भुशात नोटा ठेवल्या. भागोजींनी त्या नोटा परत केल्या आणि त्यांची प्रामाणिकता सिद्ध केली. या प्रसंगानंतर शापूरजींनी त्यांना लायन्स गार्डन, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई सेंट्रल स्टेशन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी दिली.

भागोजी कीर यांनी १५ वर्षे शापूरजी पालनजींसोबत काम केलं. त्या काळात त्यांनी मोठी बांधकामं केली. मात्र, स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभारण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. अखेरीस त्यांनी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला.

भागोजी कीर यांनी मुंबईच्या सौंदर्यात मोठी भर घातली. त्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या काही प्रमुख इमारतीः

लायन्स गार्डन (बांधकाम कालावधी १९२०) (त्या काळातील अंदाजे खर्च ₹५०,०००)

ब्रेबॉर्न स्टेडियम १९३७  ₹१ लाख

मुंबई सेंट्रल स्टेशन १९३०  ₹५ लाख

मरीन ड्राइव्हची भिंत १९३५  ₹२ लाख

स्टेट बँक बिल्डिंग  १९४०  ₹३ लाख

शिवाजी पार्कवरचे सावरकर सदन कीरांनीच बांधले.या सर्व बांधकामांनी मुंबईचं स्वरूप बदललं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भागोजी कीर यांच्यात घनिष्ठ संबंध होते. भागोजी कीर यांनी सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.

सावरकरांच्या प्रेरणेने भागोजी कीर यांनी १९३१ मध्ये रत्नागिरीत पतितपावन मंदिर बांधून दिलं, जे अस्पृश्यांसाठी खुले असलेलं भारतातील पहिलं मंदिर होतं.

भागोजी कीर आणि सावरकरांनी एकत्रितपणे अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सामाजिक समतेचा संदेश पसरला.

आपण शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप खस्ता खाल्या, ही खंत भागोजी कीर यांच्या मनात होती. त्यामुळेच त्यांनी गरिबांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या:

१) १९२९ मध्ये रत्नागिरीत मोफत शाळा स्थापन केली.
२) गाडगे महाराजांच्या प्रेरणेतून आळंदी येथे धर्मशाळा आणि अन्नछत्र सुरू केलं.
३) दादरमध्ये स्मशानभूमीची स्थापना केली, जी त्यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेल्या जमिनीवर उभारली.

भागोजींनी आणखीही काही देवळे बांधली; धर्मशाळा आणि नदीकिनारी घाट बांधले, आणि मुंबईसह पुणे, आळंदी, रत्‍नागिरी, आणि अन्य काही ठिकाणे स्मशाने बांधली
भागोजी कीर यांचं आयुष्य म्हणजे व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकीचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या यशामागील काही प्रमुख व्यवस्थापन तत्त्वे होती:

प्रामाणिकता: त्यांनी आपली प्रामाणिकता कोणत्याही परिस्थितीत कधीच सोडली नाही.


दूरदृष्टी: प्रत्येक संकटात संधी शोधण्याची त्यांची वृत्ती होती.


सामाजिक बांधिलकी: आपल्या कमाईतून समाजाच्या विकासासाठी मोठा वाटा दिला.


कष्टाळूपणा: त्यांनी शून्यातून सुरुवात करून मोठं साम्राज्य उभारलं.


भागोजी कीर यांचा जीवनप्रवास म्हणजे कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांनी केवळ संपत्ती निर्माण केली नाही, तर समाजसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं.

जर भागोजी कीर आजच्या काळात असते, तर त्यांना 'मॅनेजमेंट गुरू' किंवा 'भारतीय वॉरन बफे' म्हणून ओळखलं गेलं असतं.

आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखं खूप काही आहे – स्वप्न मोठी ठेवा, प्रामाणिक राहा आणि समाजासाठी कार्य करा!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०४/०३/२०२० वेळ : १६:१५

Post a Comment

Previous Post Next Post