जीवन संपवणारी आग की. . . .!
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष नवजात अर्भक विभागामध्ये शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) रात्री १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ मुलांचा मृत्यू ही घटना दुःखदच नाही तर रुग्णालयांमधील सुरक्षेबाबतच्या त्रुटी आणि घोर निष्काळजीपणावरही प्रकाश टाकते. देशात ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह’ (१५ ते २१ नोव्हेंबर) सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. सर्व मुले ८० टक्के जळालेली आढळून आली आणि त्यांची हाडेही उघडी पडली यावरून आगीच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्यांना पाचारण करावे लागले आणि त्यानंतरच आग आटोक्यात आणण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्डाच्या खिडक्या तोडून ३९ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये स्पार्किंगमुळे आग लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे विशेष नवजात अर्भक विभागामध्ये ठेवण्यात आलेल्या मुलांना बाहेर काढणे कठीण झाले होते. तेथे ठेवण्यात आलेल्या अग्निशमन यंत्राची मुदत चार वर्षांपूर्वीच संपल्याचे समोर आले आहे.
अग्निशमन यंत्राची मुदत संपली नसती तर आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले असते आणि आगीत अकरा अर्भकांचा बळी गेला नसता. आता या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार का, हा मोठा प्रश्न आहे. चांगली बाब म्हणजे या अपघाताच्या तपासाची जबाबदारी आयबीकडे सोपवण्यात आली आहे. आता फक्त आयबीच्या तपासातच आग कशी लागली हे स्पष्ट होईल? ही घटना निष्काळजीपणाचा परिणाम आहे की काही कटाचा भाग आहे? मात्र, रुग्णालयांना आगीपासून वाचवायचे कसे, हा प्रश्न उरतो. अर्थात, केंद्र आणि राज्य सरकारने पीडितांना भरपाई देणे ही चांगली बाब आहे. परंतु, मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देऊन सरकार आपले कर्तव्य पार पाडते, हे पुरेसे नाही. हा केवळ अपयश लपवण्याचा एक मार्ग आहे. रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार नाहीत याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. त्यांच्या सुरक्षेसाठी भक्कम व्यवस्था असायला हवी. कारण रुग्णालय आणि इतर ठिकाणी आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. क्वचितच एखाद्या वर्षी रुग्णालयातील आगीमुळे रुग्णांच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत नाही. जर रुग्णालयेच सुरक्षित नसतील आणि सुविधांनी सुसज्ज नसतील, तर तेथे काम करणारे कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्ण कसे सुरक्षित असतील, ह्यावर नक्कीच चिंतन करण्याची गरज आहे.
हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत जीव गमावण्याची ही पहिलीच वेळ नाही. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज (केजीएमयु) च्या ट्रॉमा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत आठ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण कोरोनाग्रस्त होते आणि जगण्यासाठी धडपडत होते. मात्र रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे लोकांना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि एसयूएम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, ज्यामध्ये दोन डझनहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचप्रमाणे, कोलकाता येथील प्रख्यात खाजगी हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ए्एमआरआय) मध्ये दुर्दैवी आग लागली, ज्यात ९० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. मागच्या वर्षीच मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ३२ नवजात बालके जळून राख होण्यापासून वाचली होती. आपल्या लक्षात येते की सुप्रसिद्ध रुग्णालयेच नाही तर संकुले, विवाह सभागृह, हॉटेल्स, कोचिंग इन्स्टिट्यूट, मंदिरे, जत्रेची ठिकाणे, इमारती, शाळा, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणेही सुरक्षित नाहीत.
सर्वत्र जीवन आगीच्या ज्वाळांनी उध्वस्त होत आहे. या घटनांमध्ये एक गोष्ट साम्य दिसून येते ती म्हणजे आग रोखण्यासाठी कुठेही योग्य व्यवस्था नाही. तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी गुजरातच्या सुरत येथील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली होती ज्यात २३ जणांचा मृत्यू झाला होता. तेथेही आग विझवण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती. गेल्या वर्षी राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले तिथे खेळायला गेली होती. मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी त्यांचा जीव गेला. डिसेंबर १९९५ मध्ये, हरियाणात शाळेच्या कार्यक्रमादरम्यान एका पंडालला आग लागल्याने सुमारे ४४२ मुलांचा मृत्यू झाला. तसेच ६ जुलै २००४ रोजी तामिळनाडूतील कुंभकोणम जिल्ह्यात लागलेल्या आगीत ९१ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. गेल्याच वर्षी देशाची राजधानी दिल्लीतील तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
२०१९ मध्ये राणी झाशी रोडवरील धान्य बाजारामध्ये लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीच्या औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर ५ मधील एका इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या किन्नरांच्या संमेलनादरम्यान एका पंडालला लागलेल्या आगीत १६ किन्नरांना आपला जीव गमवावा लागला होता. जोपर्यंत रुग्णालयांचा प्रश्न आहे, सर्व राज्य सरकारांनी, सरकारी रुग्णालयांना अधिक चांगल्या सुरक्षेसह सुसज्ज करणे, सुरक्षिततेशिवाय सर्व बेजबाबदार खाजगी रुग्णालयांनाही भक्कम सुरक्षा व्यवस्था सुसज्ज करणे योग्य ठरेल. गरज भासल्यास त्यासाठी कठोर कायदे करा. नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांच्या चालकांना शिक्षा करा. कारण रुग्णालयातील आगीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सरकारी असो की खासगी रुग्णालये सुरक्षा व्यवस्थेबाबत डोळेझाक करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. परिणामी, रुग्णांचे जीवन देवाच्या कृपेवर आहे. अशा स्थितीत देशातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी आगीपासून बचावासाठी आवश्यक त्या वेळी वापरण्यासाठी सुरक्षा उपकरणांसह व्यवस्था करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करणे आवश्यक आहे. आगीपासून बचाव करण्यासाठी रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणे असतात, मात्र आग लागल्यास ती उपकरणे बचावासाठी वापरली जात नसल्याचे अनेकदा दिसून येते. याचे कारण रुग्णालयांमध्ये अग्निशामक प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. ही उपकरणे वेळीच वापरली तर लोकांचे प्राण वाचू शकतात. केवळ सुरक्षा व्यवस्थेबाबत रुग्णालये उदासीन नाहीत, हे दुर्दैव आहे. आता येथे विविध प्रकारचे घोटाळेही उघडकीस येत आहेत. खासगी रुग्णालयांतून नवजात अर्भकांची चोरी करण्यापासून मानवी अवयवांची तस्करी करण्यापर्यंत अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात. आता रुग्णालये सेवेचे केंद्र बनण्याऐवजी अवैध पैसे कमविण्याचे केंद्र बनू लागले आहेत. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि मानवतेला लज्जास्पद आहे. ह्यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे आहे.
Post a Comment