कविता - रंग अंबरी लागला




आज सोनियाचा दिन
माझ्या देशाने पाहिला
भारताच्या तिरंग्याचा
रंग अंबरी लागला

द्रविडच्या खेळाडूंनी
दिली अशी मेजवानी 
साखळीच्या फेरीमध्ये 
केले साफ पाकिस्तानी

दाही दिशांत गुंजला
जय भारताचा नारा
ऑस्ट्रेलिया संघाचाही
नाही चालला दरारा

केले बंगालचे शेर 
कागदावरील चित्र
पांड्या सिंग बुमराह 
कुलदीप झाले मित्र

इंग्लंडची रोहितने
केली सूर्यासह दैना
कुलदीप बुमराह
चेंडू अक्षर दिसेना

दोन बलाढ्य संघांचा
आज सामना जाहला
संघ दक्षिण आफ्रिका 
पुढे भारत ठाकला

भारताची फलंदाजी
अचानक ढेपाळली
विराटची चेंडूफळी
धावा जोडाया लागली

दुबे अक्षरने केली
धाव प्रत्येक मोलाची
भागीदारी करताना
वीट रचली यशाची

केली स्टब्स डिकॉकने
शर्थ त्यांच्या प्रयत्नांची
साथ त्यांनाही लाभली
क्लासेनच्या पन्नाशीची

क्लासेनचा अलवार
झेल पंतने टिपला
घेता मिलरचा झेल 
क्लास सूर्याचा दिसला

फळ कठोर श्रमांचे
सार्‍या संघाला मिळाले
रोहितच्या हातामध्ये 
चंद्रतारे विसावले

जोश द्रविडचा असा
थेट देशात गुंजला
हरएक भारतीय 
आज पुन्हा सुखावला

बार्बाडोस खेळपट्टी 
जणू वानखेडे झाली
जेव्हा तिथल्या मातीची
चव शर्माने चाखली

चंद्रावर पोहोचलो
असे सार्‍यांना वाटले
जेव्हा रोहितने तिथे
ध्वज निशाण रोवले

देव कपिल पहिला
ज्याने कप उंचावला
धोनीमुळे भारताने
पुन्हा मान मिळवला

रोहितचा संघ झाला
खराखुरा जगज्जेता
खेळ मानाने खेळून
सार्‍या विश्वाचाच नेता

आज सोनियाचा दिन
माझ्या देशाने पाहिला
भारताच्या तिरंग्याचा
रंग अंबरी लागला

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ३०/०६/२०२४ वेळ : ०३५१



Post a Comment

Previous Post Next Post