भारताच्या गौरवशाली इतिहासात मातृशक्तीने प्रेरणादायी भूमिका बजावली आहे. देशाच्या संकटात स्त्री शक्तीने आपल्या ताकदीने अभूतपूर्व योगदान दिले आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्त्रीशक्तीच्या गुणांची सर्वत्र प्रशंसा केलेली आहे. भारतातील स्त्रिया आपल्या प्रतिभेने, शौर्याने, निष्ठेने आणि न्यायप्रिय प्रेमाने अनेक वर्षांपासून समाजजीवनावर प्रभाव टाकत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी वाजपेयी सरकारच्या काळात देवी अहिल्याबाई, राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, तामिळनाडूची देवी कन्नगी, नागालँडची राणी गाईडिल्यू यांच्या नावाने स्त्री शक्ती पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. महिला शक्तीच्या सक्षमीकरणासाठी, २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी लष्कराच्या शौर्याचे प्रदर्शन करण्यासाठी विद्यमान सरकारने महिलांना नेतृत्व दिले.
सध्याच्या परिस्थितीत लोकमाता अहिल्याबाईंची ३०० वी जयंती साजरी करणे समर्पक आहे. औरंगाबादच्या बीड तालुक्यातील चौडी या छोट्याशा गावात ३१ मे १७२५ रोजी एका सामान्य कुटुंबातील मुलीचा जन्म झाला. आजही माळवा राज्यात अहिल्याबाईंना लोकमाता आणि आदर्श राणी म्हणून ओळखले जाते. देवी अहिल्याबाई, एका छोट्या राज्याच्या राणी असूनही त्यांचा दृष्टिकोण अखिल भारतीय होता. त्यांच्या आयुष्याचा प्रवास संघर्ष आणि दुःखांनी भरलेला होता, तरीही त्यांनी इंदूर राज्याचा कारभार कुशलतेने चालवला. त्यांचे बालपण श्रद्धाळू आई-वडिलांच्या कुशीत गेले. पालकांनीही अहिल्याच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था केली. अहिल्येच्या पालकांनी तिला रामायण आणि महाभारतातील कथा सांगून धार्मिक नैतिकतेचे व्यावहारिक ज्ञान दिले. कन्या अहिल्याचा विवाह माळवा सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव याच्याशी १७३३ मध्ये झाला. देवीचे वैवाहिक जीवन सुखी नव्हते. खंडेराव वाईट सवयींमध्ये अडकले होते. दुसरीकडे सुभेदार मल्हारराव पेशव्यांसोबत युद्ध मोहिमांमध्ये व्यस्त राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सून अहिल्याबाईंनी राज्याचा कारभार चालवला. अचानक कुमेरच्या रणांगणात गोळी लागल्याने खंडेरावांचा मृत्यू झाला. काही वर्षांनी सासरे आणि एकुलता एक मुलगाही वारला. एकापाठोपाठ आलेल्या संकटांना सामो्रे जाताना त्यांनी संयमाने राज्यकारभाराची जबाबदारी पार पाडली आणि लोककल्याणाच्या कामात स्वतःळा मनापासून गुंतवून घेतले. सर्वप्रथम अहिल्याबाईंनी अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न केले. राज्याला चोर आणि दरोडेखोरांपासून मुक्त करण्याची जाहीर घोषणा करताना त्यांनी जाहीर केले की, जो तरुण माझ्या राज्यातील चोर-लुटारूंचा विळखा संपवून लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करेल, त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्ताबाईचे लग्न लावून देईन. ते ऐकून एक तरुण उभा राहिला. त्यांचे नाव यशवंतराव फणसे. त्या काळात वैवाहिक संबंध जात-पात आणि गरीब-श्रीमंत या निकषांवर होत असत. लोकांच्या रक्षणासाठी पारंपारिक प्रथा मोडून शौर्याच्या जोरावर आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाची घोषणा त्यांनी केली, हे क्रांतिकारी पाऊल होते. आपला शब्द राखत त्यांनी आपल्या मुलीचे लग्न यशवंतराव फणसे यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिले.
देवी केवळ एक कार्यक्षम प्रशासकच नव्हत्या तर एक न्यायी व्यक्ती देखील होत्या. लोकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वस्त आणि सुलभ व्यवस्था केली होती. त्यांनी ठिकठिकाणी न्यायालये स्थापन करून पात्र व्यक्तींची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयाच्या निर्णयावर असमाधानी व्यक्ती त्यांच्या दरबारात दाद मागू शकत असे. त्यांच्या न्यायनिष्ठेचे उत्तम उदाहरण ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळते. त्यांचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दोन घोडे घेण्यासाठी एका व्यक्तीकडून पैसे उसने घेतले होते पण राजाने ते पैसे परत केले नाहीत. सावकार राणोजी थिटे मूळ कागदपत्रांसह न्यायालयात हजर झाला. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ व्याजासह मूळ रक्कम परत करण्याचे आदेश जारी केले. राणी अहिल्येच्या आर्थिक धोरणाचा उद्देश जनतेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे हा होता. लोकांवर कमी कर लादणे जेणेकरून कर भरण्यात अडचण येऊ नये. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडल्यास शेतकऱ्यांचे कर माफ करायच्या. राज्यात व्यापार उद्योगांना चालना मिळाली. व्यापाऱ्यांना न घाबरता मालाची आयात-निर्यात करता यावी यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. त्यांच्या राज्यात किंचितही भ्रष्टाचार नव्हता. अहिल्याबाई लष्करी कारवायांमध्येही पारंगत होत्या. त्यांनी सैन्याला शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करून युद्धकलेचे प्रशिक्षण दिले होते. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर राघोबा पेशव्याला इंदूर राज्य काबीज करायचे होते. तो आपल्या सैन्यासह क्षिप्राच्या काठी पोहोचला. राणी अहिल्याबाई सुद्धा आपल्या महिला सैन्यासह रणांगणावर त्यांच्यासमोर उभ्या होत्या. त्यांनी राघोबा पेशव्यांना निरोप पाठवला की 'मला असहाय स्त्री समजून माझे राज्य बळकावण्याच्या उद्देशाने तुम्ही आला आहात, पण तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. जर मी युद्धात पराभूत झाले तर कोणीही माझ्यावर हसणार नाही आणि तुम्ही मिळवलेल्या विजयाची स्तुतीही करणार नाही. पण जर युद्धात हरलात तर तोंड दाखविण्यासाठी लायक उरणार नाही. अबलेवर हल्ला केल्याने तुमची बदनामी होईल. त्यामुळे सारासार विचार करून युद्धात उतरा. या पत्राने राघोबाचा उत्साह थंडावला. अहिल्याबाई युद्धप्रेमी नव्हत्या, परंतु युद्ध आवश्यक झाले तर त्या मागे हटणार नव्हत्या. अहिल्याबाईंचे समर्पण उच्च दर्जाचे होते. त्यांनी भगवान शिवाला राज्याचे प्रमुख देवता मानले आणि त्यांच्या प्रतिनिधी म्हणून स्वतः राज्य केले. भगवान शिवाच्या नावाने शासन आदेशही जारी करण्यात येत असत. त्या आपल्या वैयक्तिक संपत्तीतून धर्मादाय कार्यासाठी वित्तपुरवठा करत असत. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणार्या अहिल्याबाई ह्या पहिल्या महिला होत्या.
३१ मे २०२४ पासून भारतात लोकमाता अहिल्याबाईंच्या ३०० व्या जयंती सोहळ्याला सुरुवात होत आहे. लोकमाता अहिल्याबाई यांची जयंती संपूर्ण देशात साजरी करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ताजी यांनी केले आहे. अहिल्याबाईंचे जीवन भारतातील महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरेल. अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. प्रशासकीय क्षमता, शौर्य, युद्धकौशल्य, मुत्सद्दीपणा, न्याय, परोपकार इत्यादी विविध गुण त्यांच्या अंगी विपुल प्रमाणात होते. अहिल्याबाईंना आधुनिक भारताचे मूर्त स्वरूप म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या हयातीत लोकमाता म्हणून त्या लोकांच्या मनात पूजनीय झाल्या. त्या स्त्रीशक्तीचे मूर्त रूप आहेत. अहिल्याबाई कोणत्याही प्रांत, राज्य किंवा प्रदेशाच्या हद्दीत बंदिस्त होऊ शकत नाहीत. संपूर्ण भारतातील स्त्रीजातीसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे जीवन मानवजातीचा अमूल्य वारसा आहे.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ३१/०५/२०२४ वेळ : ०२२०
Post a Comment