काँग्रेस मुक्त भारत की काँग्रेस युक्त भाजप?


सुरुवातीला भाजपचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूकीत किती माजी काँग्रेसजनांना भाजपचे तिकीट मिळाले याची मोजणी करत असत, मात्र आता त्यांची मोजणी थांबली आहे. काँग्रेसचे माजी नेते संजय झा यांनी याविषयी केलेली टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या सद्यस्थितीचे उत्तम प्रकारे वर्णन करते.

त्यांनी लिहिले आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणूका राहुल गांधींच्या काँग्रेस आणि मोदींच्या काँग्रेसमध्ये असतील. काँग्रेसमुक्त भारताचा अर्थ असा नव्हता की सर्व काँग्रेसजनांना भाजपमध्ये सामील करून घ्या आणि त्यांना राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेची तिकिटे देऊन भाजपचे काँग्रेसमध्ये रूपांतर व्हावे.

सत्तेच्या या आंधळ्या हव्यासापोटी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचा आदर्श असलेला भाजप भरकटला आहे. काँग्रेसमुक्त भारताऐवजी भाजपमुक्त भारत झाला आहे. जनसंघ परिवारातून आलेले भाजप कार्यकर्ते डॉ. मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, डॉ. रघुबीर, बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची तत्त्वे आणि आदर्श असलेली भाजप शोधत आहेत.

जनता पक्षापासून फारकत घेतलेल्या भाजपकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले प्रचारक पाठवणे सुरूच ठेवले, त्याचप्रमाणे जनसंघातील संघाचे प्रचारक पक्षाचा कणा असायचे. पक्षातील विचारधारा ते चालवत असत. पक्षात संघटन महामंत्रीपद आजही त्यांच्याकडे आहे, पण ज्या कामासाठी त्यांना पक्षात आणले ते आता अनावश्यक बनले आहे. कारण आपला अजेंडा राबवण्यासाठी निवडणूकीच्या राजकारणात नेहरू घराण्याचा काँग्रेसवर विजय मिळविण्याचे पक्षाचे ध्येय आहे.

जनसंघाच्या मुशीतून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांची विचारसरणी कशीही असली तरी साम दाम दंड भेद वापरून जे काही पूर्वीचे नेते करू शकले नाहीत ते नरेंद्र मोदींनी साध्य केले आहे. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जम्मू आणि काश्मीर मधील दोन प्रतीके (जम्मू आणि काश्मीरचा स्वतंत्र ध्वज), दोन राज्यघटना (जम्मू आणि काश्मीरची स्वतंत्र राज्यघटना) आणि दोन प्रमुख (जम्मू-काश्मीरचे स्वतंत्र पंतप्रधान) यांच्या विरोधात आपला जीव धोक्यात घातला. 

अटल-अडवाणींच्या भाजपला सहा वर्षे सत्तेत राहूनही कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. पण पुन्हा सत्तेत आल्यानंतर मोदींनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे आता तिथे ना दोन संविधान आहेत ना दोन चिन्हे आणि वजीर-ए-आलामचे पद आधीच संपले होते.

नरेंद्र मोदींवर भाजपचे काँग्रेसमध्ये रुपांतर केल्याचा आरोप आहे. पण त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहा, मोठ्या संख्येने काँग्रेसजनांना भाजपमध्ये आणून त्यांनी सिद्ध केले की, काँग्रेसचे अनेक तळागाळातील नेते काँग्रेसच्या धोरणांमुळे काँग्रेससोबत नाहीत, ते केवळ सत्तेची मलई उपभोगण्यासाठी काँग्रेससोबत आहेत.

अटल आणि अडवाणी यांनीही भाजपचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता, लक्षात ठेवा, १९८० मध्ये भाजपची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधीवादी समाजवादाला पक्षाची विचारधारा बनवली होती. जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले मोहम्मदिल करीम छागला आणि प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांना त्यांनी मुंबईत पक्षाच्या पायाभरणी कार्यक्रमात आणले होते.

मुस्लिमांची मने जिंकण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी पाकिस्तानात जाऊन जिनांचे कौतुक केले होते.  पण ते दोन्ही यशस्वी झाले नाहीत, कारण सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या भाजपची कल्पना हिंदूंनी केली नव्हती. श्री रामजन्मभूमी आंदोलनात भाजपने उडी घेतल्यानंतर हिंदू पुन्हा भाजपमध्ये सामील होऊ लागले. पण वाजपेयी आणि अडवाणी यांनी सत्तेसाठी एनडीए स्थापन करून भाजपच्या तीनही प्रमुख मुद्द्यांवर तडजोड केली.

नरेंद्र मोदी हे संघाच्या मुशीत तयार झालेले विचारधारेचे कट्टर भाजप कार्यकर्ते आहेत, ते भाजपला सत्तेवर आणू शकले कारण गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशभरातील हिंदूंचा विश्वास जिंकला होता. पण २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली हिंदू क्रांती जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटेपर्यंत अपूर्ण होती.

२०१४ ते २०१९ या काळात मोदी फार काही करू शकले नाहीत, भाजपच्या तिन्ही मुद्द्यांवर त्यांनी कोणतेही काम केले नाही, पण तिहेरी तलाकसारख्या मुद्द्यावर विधेयक मंजूर करून घेऊन मुस्लिम कट्टरतावाद्यांसमोर झुकणार नाही, अशी वचनबद्धता दाखवून दिली. दोन्ही सभागृहात बहुमत मिळताच ते भाजपचे तीन अजेंडे पूर्ण करतील - श्री रामजन्मभूमी मंदिर, जम्मू-काश्मीरमधून ३७० हटवणे आणि समान नागरी कायदा.

असे असूनही २०१९ च्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने काँग्रेसवाले भाजपमध्ये सामील झाले, कारण त्यांची विचारधारा काहीच नव्हती, त्यांची विचारधारा फक्त सत्ता होती. पण पुन्हा सत्तेत येताच केवळ तीन महिन्यांत, मोदींनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून देशाला खरी श्रद्धांजली दिली.

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. भाजपला पूर्वीपेक्षा मोठा जनादेश मिळवून समान नागरी कायद्याचा अजेंडा पूर्ण करायचा आहे आणि नंतर मथुरा आणि काशीची मंदिरे मुक्त करायची आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते आपापले मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

१९९६ आणि १९९८ मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने तिन्ही मुद्द्यांवर तडजोड केली होती. आता भाजप आपल्या तीन मुद्द्यांवर ठाम असताना राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहे.

जम्मू-काश्मीरमधून नॅशनल कॉन्फरन्सच्या एमएलसी शहनाज गनई, पंजाबमधून काँग्रेस नेते अमरिंदर सिंग आणि सुनील जाखर, हरियाणातून अशोक तंवर, हिमाचलमधून हर्ष महाजन, उत्तराखंडमधून विजय बहुगुणा आणि किशोर उपाध्याय, उत्तर प्रदेशमधून जगदंबिका पाल आणि रीता बहुगुणा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्राचे मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण, आंध्र प्रदेशचे किरणकुमार रेड्डी, कर्नाटकचे एस.एम. कृष्णा, यापैकी अनेक काँग्रेस नेते आपापल्या राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष नरसिंह राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री, काँग्रेसचे माजी सरचिटणीस ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी, काँग्रेसचे माजी सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा समीर द्विवेदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि राजीव गांधी आणि नरसिंह राव या दोन पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार जितेंद्र प्रसाद यांचा मुलगा जितिन प्रसाद यांचा समावेश होतो, तेव्हा ते आणि त्यांचे कुटुंबीय काँग्रेसशी विचारधारेमुळे जोडले गेले होते की सत्तेमुळे या प्रश्नाचे उत्तर मिळते. नेहरू घराणे जोपर्यंत त्यांना सत्तेवर आणू शकत होते तोपर्यंत ते काँग्रेससोबत होते आणि आता नरेंद्र मोदीच त्यांना सत्तेवर आणू शकतील असे वाटताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांचे लोकसभेचे तिकीट निश्चित झाले असते तर ते काँग्रेसमध्येच राहिले असते, कमलनाथ यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले असते तर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचारही केला नसता. पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा धर्म, श्रद्धा आणि विचारधारा नसतो.  सत्तेत सहभागी होणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये कोण प्रवेश करत आहे, याकडे मोदी समर्थकांचे लक्ष नाही, त्यांचा हेतू मोदींच्या विचारधारेशी बांधिलकी आहे. नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या विचारधारेशी तडजोड करत नाहीत, हे हिंदूंसाठी पुरेसे आहे. होय, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना नक्कीच वेदना होतात जेव्हा नरेंद्र मोदी भाजपमध्ये प्रवेश करताच नारायण राणे, अशोक चव्हाण, आरपीएन सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेत आणतात आणि मंत्री बनवतात, ज्यांच्या कुटुंबांसोबत त्यांनी अनेक दशके संघर्ष केला आणि अशांनाच रातोरात त्यांचा नेता बनवलं जातं.

काँग्रेस किंवा अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना वरिष्ठ सभागृहाचे सदस्य बनवू नये, त्यांना निवडणूका जिंकल्यानंतरच सरकारमध्ये सामावून घ्यावे, अशी सर्वसामान्यांची तसेच कार्यकर्त्यांची धारणा आहे. अन्यथा मोदी भाजपला काँग्रेसमध्ये बदलत आहेत, असे दिसेल. आज जे नेते सत्तेसाठी भाजपमध्ये आले आहेत, उद्या तेच सत्तेसाठी भाजप सोडून अन्य कुठल्यातरी पक्षातही जातील. वर्षानुवर्ष निष्ठेने भाजपचंच काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी, आयारामांच्या आदेशांची फक्त अंमलबजावणीच करायची काय? त्यांना नेतृत्वाची संधी कधी मिळणार? अशा प्रश्नांची उत्तरं पक्षनेतृत्वाला शोधावी लागतील.


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : १९/०२/२०२४ वेळ ०९०४


Post a Comment

Previous Post Next Post