कविता - अरुण दाते – एक शुक्रतारा


सुवर्णक्षण
६.५.२०२३

अरुण दाते – एक शुक्रतारा
(४ मे १९३५ – ६ मे २०१८)

दातेंच्या अरविंदाचा 'अरुण'
देवांच्या यशवंताने केला
अलवार शुक्रतार्‍याचा स्वरसाज
रसिकांच्या मनावर ठसला

या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे सांगताना
हेच शब्द आणि स्वर
आयुष्याचे शुभंकर बनताना

स्वरगंगेच्या काठावरती
असाच यावा पहाटवारा           
धुके दाटता उदास उदास
नयनांतून झरती श्रावणधारा

उषःकाल होता होता
गीत आसावले तुझ्यासाठी
कसा सूर मागू तुला मी
“येशिल” ही साद ऐकण्यासाठी

ती रात्र कुसुंबी बहराची           
दिल्या घेतल्या वचनांची
भावगीतांच्या स्वरांची
शतदा प्रेम करण्याची

अखेरचे शब्द तेच कानी
त्या तेजस्वी शुक्रतार्‍याचे
अविरत ओठी यावे नाम
भातुकलीच्या खेळातल्या राजाचे

असा दवभरला दर्दभरा आवाज
मैफलीने कानात अखंड साठवावा
सूरदात्याच्या गंधित दैवी स्वरांनी
रसिकांच्या जीवनात आनंद पसरावा

- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र 
दिनांक ०५/०५/२०१९ वेळ ०५२२
संपर्क  +91 99877 46776

Post a Comment

Previous Post Next Post