सुवर्णक्षण
९.५.२०२३
महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून मेवाडचे संरक्षण केले. आपल्या अभिमानासाठी आणि गौरवासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही. यामुळेच महाराणा प्रताप यांच्या शौर्यापुढे कोणताही शत्रू टिकू शकला नाही.
उंची ७ फूट ५ इंच, वजन ११० किलो ८१ किलो वजनाचा जड भाला आणि छातीवर ७२ किलो वजनाचे चिलखत. असे म्हणतात की, महाराणा प्रताप यांच्याकडे नेहमी प्रत्येकी १०४ किलो वजनाच्या दोन तलवारी असत. नि:शस्त्र शत्रू भेटला तर त्याला एक तलवार देता यावी म्हणून महाराणा दोन तलवारी आपल्याजवळ बाळगत असत, कारण त्यांनी कधीही नि:शस्त्र शत्रूवर वार केला नाही. शत्रूंनाही त्यांच्या लढाऊ कौशल्याची खात्री होती. ज्यांनी मुघल शासक अकबराच्या अभिमानाचाही चक्काचूर केला. ३० वर्षे सतत प्रयत्न करूनही अकबर त्यांना कैदी बनवू शकला नाही. अशा शूर योद्धा महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी राजस्थानमधील मेवाड येथे झाला. राजपूत राजघराण्यात जन्मलेले प्रताप हे उदयसिंग द्वितीय आणि महाराणी जयवंताबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते एक महान योद्धा आणि युद्ध रणनीती कौशल्यतज्ञ होते. महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून मेवाडचे संरक्षण केले. आन, बान आणि शानसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कधीही हार मानली नाही. यामुळेच महाराणा प्रताप यांच्या शौर्यापुढे कोणत्याही शत्रूचा निभाव लागला नाही.
अकबराने मेवाड जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अजमेरला आपले केंद्र बनवून अकबराने महाराणांविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली. महाराणा प्रताप यांनी मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी अनेक वर्षे युद्ध केले. त्यांचे औदार्य इतके होते की, ताब्यात घेतलेल्या मुघल बायका आदरपूर्वक त्याच्याकडे परत पाठवल्या.
प्रचंड मुघलिया सैन्य, अतुलनीय दारुगोळा, युद्धाच्या नवीन पद्धतींचे ज्ञान असलेले सल्लागार, हेरांची एक लांबलचक यादी हे सारं असूनही महाराणा प्रताप यांना वाकवण्यात अकबर अपयशी ठरला तेव्हा त्याने आमेरचे महाराज भगवानदास यांचा पुतण्या मानसिंग याची डुंगरपूर आणि उदयपूरच्या राज्यकर्त्यांना अधीनता स्वीकारण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने नियुक्ती केली. मानसिंगाच्या मोठ्या सैन्यबळापुढे डुंगरपूर राज्य फारसा प्रतिकार करू शकले नाही.
यानंतर मानसिंग महाराणा प्रतापांचे मन वळवण्यासाठी उदयपूरला पोहोचला. मानसिंगने त्यांना अकबराच्या अधीन राहण्याचा सल्ला दिला, परंतु महाराणांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे ठामपणे जाहीर केले आणि युद्धात त्याचा सामना करण्याची घोषणा केली. बादशहाने मानसिंगचे उदयपूरहून रिकाम्या हाती परतणे हा स्वतःचा दणदणीत पराभव म्हणून मनावर घेतला आणि मेवाडवर हल्ला करण्यासाठी मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रचंड मुघलिया सैन्य पाठवले. अखेरीस, ३० मे १५७६ रोजी बुधवारी सकाळी हळदी घाटीत घनघोर युद्ध सुरू झाले.
मुघलांचे प्रचंड सैन्य टोळांच्या थव्याप्रमाणे मेवाडच्या भूमीकडे धावले. त्यात मुघल, राजपूत आणि पठाण योद्धांसह जबरदस्त तोफखानाही होता. अकबराचे प्रसिद्ध सेनापती महावत खान, असफ खान, मानसिंग, शहजादा सलीम (जहांगीर) हे देखील मुघल सैन्य चालवत होते, ज्यांची संख्या ८० हजार ते १ लाख पर्यंत असल्याचे इतिहासकार सांगतात. अकबराच्या प्रचंड सैन्यासमोर महाराणा प्रताप आपल्या २० हजार सैनिक आणि मर्यादित साधनांच्या बळावर अनेक वर्षे स्वातंत्र्यासाठी लढले. या युद्धात जखमी होऊनही महाराणा मुघलांच्या हाती लागले नाहीत.
महाराणा प्रताप काही साथीदारांसह जंगलात लपले आणि जंगलात मुळे आणि कंद खाऊन लढत राहिले. महाराणा पुन्हा येथून सैन्य गोळा करू लागले. तथापि, तोपर्यंत, एका अंदाजानुसार, मेवाडच्या शहीद सैनिकांची संख्या १,६०० वर पोहोचली होती, तर मुघल सैन्याने ३५० जखमी सैनिकांव्यतिरिक्त ७,८०० सैनिक गमावले होते. ३० वर्षांच्या अखंड प्रयत्नांनंतरही अकबर महाराणा प्रताप यांना कैदी बनवू शकला नाही. अखेरीस, अकबराला महाराणांना पकडण्याचा विचार सोडून द्यावा लागला.
महाराणा प्रताप यांनी अकबराची अधीनता स्वीकारून 'दीन-ए-इलाही' धर्म स्वीकारावा, अशी मुघलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी महाराणा प्रतापांना अनेक मोहक संदेशही पाठवले, परंतु महाराणा प्रताप आपल्या निर्धारावर ठाम राहिले. महाराणा राजपूतांचे सम्राट होते, हिंदुत्वाचा ते अभिमानसूर्य होते, कठीण परिस्थितीत, संकटात, त्याग, निर्धारामध्ये ते अविचल राहिले. आपला देश, जात, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारा आणि अखंड लढा देणारा एक महान योद्धा म्हणून ते नेहमीच लोकांच्या हृदयात जिवंत राहतील.
महाराणा प्रताप यांचा चेतक हा घोडाही त्यांच्यासारखाच शूर होता. महाराणांसोबत त्यांचा घोडा नेहमी लक्षात राहतो. जेव्हा मुघल सैन्य महाराणा प्रतापांच्या मागे जात होते, तेव्हा महाराणांना पाठीवर घेऊन चेतकने २६ फूट नाला ओलांडला, जो मुघलांना पार करता आला नाही. महाराणांना वाचवण्यासाठी चेतकने प्राण सोडले.
असे म्हटले जाते की, महाराणा प्रताप यांना ११ राण्या होत्या, त्यापैकी अजबदे पनवार ही मुख्य राणी होती आणि त्यांच्या १७ मुलांपैकी अमरसिंह हे महाराणा प्रताप आणि मेवाडचे १४ वे महाराणा यांचे उत्तराधिकारी बनले. १९ जानेवारी १५९७ रोजी महाराणा प्रताप यांचे निधन झाले. या महाराणाच्या मृत्यूने अकबराचेही डोळे ओले झाले असे इतिहासकार सांगतात.
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
दिनांक ९ मे २०२३ वेळ ०६:२१
Post a Comment