पाऊलवाट ते हमरस्त्याचा गाभा असलेले 'सुवर्णक्षण'

सुवर्णक्षण
४.५.२०२३

    आयुष्याची साठवण म्हणून काहीतरी शिल्लक असावं असं माझ्यासारखं प्रत्येकालाच वाटत असावं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीनं क्षण साठवण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणी चित्र रेखाटतं, कोणी छायाचित्रांच्या दुनियेत हरवून जातं, कोणी संगीताच्या सुरांचा वेध घेत अंतरंगाशी एकरुप होत जातं तर कोणी नुसतंच जगत जगत कटू अनुभवांचे घोट घेत तेवढ्याच घटनांमध्ये गुरफटून राहून आयुष्य व्यतीत करतं. आयुष्याच्या संध्याकाळी जेंव्हा कधीतरी निवांत बसून हे शब्द वाचण्याची संधी मिळेल तेंव्हा किती वेगळा अनुभव असेल कुणास ठाऊक? तेंव्हा हे माझ्याकडून झालेलं लिखाण माझ्यासाठीच एक ‘सुवर्णक्षण’ ठरेल. नेहमी ठेचकाळत, धडपडत पुढे सरकणार्‍या माझ्यासारख्या वाटसरुच्या वाटेवरील हा एक मैलाचा दगड ठरेल. लिखाणातूनही मनांमध्ये शब्दसेतू उभारता येतो. मनाशी संधान साधता येतं. जर शब्द प्रामाणिक आणि आतून आलेले असतील तर वाचणार्‍यांच्या मनाचा वेध घेतल्याशिवाय राहत नाहीत. प्रत्येकाच्या मनाची खोली वेगळी असते. तसाच प्रत्येकाच्या मनात एक नाजूक अन् हळवा कोपराही असतो, हे मात्र नक्की!! सर्वांसमोर मान्य करण्यास कितीही कचरलो तरी आपल्या मनाशी झालेली गट्टी आपण सोडून अजून कोण ओळखू शकेल.

आपण सारेच जीवनाच्या भाऊगर्दीमध्ये आपली वेगळी पाऊलवाट तयार करीत असतो. जेंव्हा ही छोटी पाऊलवाट मोठी प्राप्ती करून देते तेव्हा जगाला कळते अन् आपल्याला मान्यता मिळते, तेंव्हाच नकळत ही छोटीशी पाऊलवाट कधी हमरस्त्यामध्ये मिसळून जाते ते आपल्यालाही समजत नाही अन् मग पुन्हा माघारी फिरायचं म्हंटलं तरी फिरता येत नाही, पण ही पाऊलवाट चालताना अनुभवलेली धुंदी तशीच उरात 'सुवर्णक्षण' म्हणून कायमची कोरून ठेवायची आहे. 

आज सर्वार्थाने एक वेगळा दिवस आहे. हा दिवस आणि हा क्षण जपण्याचा. खूप काही गमावलेलं पुन्हा नव्यानं उभारण्याचा. एकांताग्नीच्या यज्ञात अहोरात्र समिधेप्रमाणे अर्पिलेल्या जाणिवांचा आणि पंचभूतात विलीन होणार्‍या क्षणांना मूर्तिमंत शब्दरुप देणेही थोडं अवघड होतंय, पण माझा निर्णय झाला आहे, आता हळूहळू इथे एक एक शिल्प कोरायचे, स्वतःशी प्रामाणिक राहून, आकाराच्या बध्द्तेत न अडकता आणि सौंदर्याच्या शालिनतेमध्ये बध्द् न होता… आपले शब्द… स्वतःचे शब्दशिल्प उतरवायचे. ज्यांचा संबंध माझ्याशी, माझ्या विचारांशी अन् माझ्या अनुभवांशी असेल… आरोप प्रत्यारोपांपलिकडे कदाचित या भौतिकतेपलिकडेही जाऊन इथे वावरायचे अन् जीवन ओवीबद्ध करायचे हे 'सुवर्णक्षण'.
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र.
संपर्क : +91 99877 46776

Post a Comment

Previous Post Next Post