कविता - राजसा, निजलास का रे…
रात्रीच्या शांत काठावर
चंद्र थबकून उभा होता,
आणि माझ्या कुशीत
तुझं बालपण
हळूच श्वास घेत होतं…
राजसा,
निजलास का रे?
तुझ्या मिटलेल्या पापण्यांवर
मी चांदण्यांची ऊब ठेवली,
दुःखाचा एकही काटा
तुझ्या पावलांना टोचू नये
म्हणून
माझं संपूर्ण आयुष्य
उंबरठ्यावर ठेवून दिलं…
तू झोपताना
माझं बोट घट्ट धरायचास,
जणू त्या छोट्याशा मुठीत
साऱ्या जगाची भीती
हलकेच थरथरत असायची…
कधी अचानक
झोपेतच हसायचास,
आणि तुझ्या ओठांवरचं ते हास्य
पाहून
माझ्या घरात
नवी सकाळ उगवायची…
मी तुझ्या मऊ केसांतून
हळुवार हात फिरवत,
अंगाईचे मंद स्वर
रात्रीच्या ओंजळीत
सावकाश ठेवत राहायचे…
तुझ्या छोट्याशा हास्यात
माझे सारे उत्सव होते,
आणि तुझ्या रडण्यात
माझं आभाळ
ओलं होत राहायचं…
तू झोपला की
घरभर शांतता फुलायची,
जणू देवघरातील
समईने
हळूच डोळे मिटावेत…
तुझ्या श्वासांच्या लयीवर
माझी रात्र
निवांत विसावत असे,
आणि पहाट
तुझ्या कपाळाशी
सोनकिरण अलगद ठेवत असे…
राजसा…
अजूनही
तसाच निश्चिंत आहेस ना?
आजही
त्या जुन्या अंगाईच्या ओळी
भिंतींवर टेकून रडतात,
आणि माझे थकलेले हात
हवेतच तुला
थोपटत राहतात…
काळ पुढे गेला,
तूही मोठा झालास,
पण आईच्या मनातलं
तुझं लेकरूपण
कधीच मोठं झालं नाही.
आजही
दार हलकंसं वाजलं की
मला वाटतं,
तू धावत येशील
पायांवर धुळीचं चांदणं घेऊन…
आणि नेहमीसारखा
माझ्या कुशीत शिरून
हळूच म्हणशील—
“आई…
मी आलो.”
त्या एका हाकेवर
माझ्या आयुष्याचा
संपूर्ण अंधार
उजळून निघेल…
आणि पुन्हा
या रिकाम्या घरात
श्वासांची चाहूल लागेल,
भिंतींना पुन्हा
जिवंत ऊब मिळेल…
राजसा,
निजलास का रे?
की अजूनही
माझ्या मायेच्या कुशीत
तसाच
हसत पडला आहेस…
जसा
पहिल्यांदा
माझ्या अंगाईवर
डोळे मिटले होतेस…
आणि त्या क्षणी
माझ्या अस्तित्वाला
पहिल्यांदा
“आई”
हे नाव उमटलं होतं…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०३/०६/२०२६ वेळ: १०:३५
Post a Comment