कविता - विश्वासाचा श्वास


कविता -  विश्वासाचा श्वास

श्वास थांबला की
देह शांत होतो…

तसंच
विश्वास हरवला की
नातं आतून विखुरतं…

शब्द तेच राहतात
पण अर्थ हरवतो मनातून…

डोळ्यांत नजर असते
पण ओळख धूसर होते…

हातात हात असतो
पण स्पर्शातील उब विरते…

विश्वास म्हणजे
डोळ्यांना न दिसणारा
जाणिवेला जाणवणारा
आत्म्याला बांधणारा धागा
जो दोन जीवांना
एकाच नात्यात गुंफून ठेवतो…

तो तुटला की
प्रेमही 
अंधारात हरवतं…

आणि पुन्हा जुळला की
हरवलेली माणसंही
आपुलकीच्या प्रकाशात 
उजळून निघतात…

म्हणूनच
श्वास जसा शरीराचा आधार
तसाच विश्वास
नात्यांचा अखंड, शांत श्वास आहे…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २५/०४/२०२६ वेळ: ०३:५१

Post a Comment

Previous Post Next Post