कविता - विनाशाची करुण गाथा


तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, आयोजित तितिक्षा नाट्य काव्य लेखन करंडक स्पर्धा २०२६

विशेष काव्यलेखन करंडक स्पर्धा

स्पर्धा कालावधी
स्पर्धा दिनांक : २५/०३/२०२६ ते २७/०३/२०२६

सकाळी ६:३० ते रात्रौ १२:३०

नाटक : संगीत एकच प्याला
(राम गणेश गडकरी लिखित अमर संगीत नाटक “एकच प्याला”वर आधारित काव्यरूप)

काव्यप्रकार : मुक्तछंद

शीर्षक : विनाशाची करुण गाथा

रंगमंचावर पडदा हळुवार सरकतो,
नेपथ्याच्या मंद प्रकाशात मराठी संगीत रंगभूमीची परंपरा
संवाद, पद आणि रागांच्या स्वरांत जीवनाचा करुण अध्याय उलगडते.

घरगुती वातावरण, मित्रमंडळींची बैठक; विनोद-टोमण्यांची खळखळ,
पण त्या हास्यामागे तळीरामाच्या डोळ्यांत चमकतो कपटी विचार.

तो पेल्यातील मद्य पुढे करीत म्हणतो—
“दादासाहेब, औषध म्हणून घ्या… फक्त एकच प्याला!”

सुधाकराच्या मनात उसळते अपमानाचे, अस्वस्थतेचे वादळ;
क्षणभर विवेकाचा दिवा थरथरतो, पण मोहाच्या धुक्यात
हात पुढे सरकतो त्या पेल्याकडे— आणि नियतीचा पहिला अंक सुरू होतो.

नेपथ्यातून ऐकू येतो करुण संगीत; रागाच्या पदांतून चेतावणी,
पण मोहाचे संगीतच अधिक गोड भासते.

घरात उभी असते सिंधू— पतिव्रतेच्या तेजाने उजळलेली;
तिच्या डोळ्यांत विश्वास, ओठांवर संयम, अंतःकरणात अखंड निष्ठा.

सिंधू उभी राहते पतिव्रतेच्या तेजाचा दीप बनून—
संसाराच्या अंधारातही ज्याचा प्रकाश कधी विझत नाही.

रामलालच्या मनात चिंता; अंगणात खेळणारे निरागस बाळ,
पण तळीरामाच्या हातात पुन्हा पेला— “बस्स… एकच प्याला!”

अंकागणिक संघर्ष गडद होतो; सुधाकराच्या जीवनात
मद्याचे सावट हळूहळू दाटत जाते.

रात्र गडद होते; घरात भुकेचे सावट,
सिंधूच्या कुशीत रडणारे बाळ, दोन पैशांचे जपलेले शेवटचे नाणे.

मद्याच्या धुंदीत अंध झालेला सुधाकर संशयाने पेटतो;
शब्दांचे विष ओकतो आणि विवेकाचा शेवटचा दिवा विझतो.

क्षण येतो— काठी हवेत फिरते;
बाळाला वाचवण्यासाठी सिंधू पुढे झेपावते, आईच्या मायेचे कवच बनून.

त्या एका क्षणात रक्ताने लाल होते घराचे अंगण;
निरागस जीव शांत होतो, पतिव्रतेच्या वेदना करुण रागात विरघळतात.

रंगमंचावर नीरव शांतता; सुधाकराच्या अंतःकरणात
पश्चात्तापाचा ज्वालामुखी उसळतो.

तो रामलालला सांगतो—
“या सर्व अनर्थाचा उगम मी घेतलेल्या त्या पहिल्या प्याल्यात होता.”

सिंधूच्या पवित्र चरणांशी मस्तक ठेवून तो जगाला सांगतो—
“जो जो भेटेल त्याला सांग, राजा असो वा रंक, ज्ञानी वा अशिक्षित—
काय वाटेल ते पाप करा, पण दारूचा पहिला प्याला घेऊ नका.”

रंगमंचावरील दिवे मंद होतात, पडदा पडतो;
पण समाजाच्या मनात घुमत राहतो एक अमर इशारा.

संसार, प्रेम, आयुष्य आणि वंश— सर्व काही बुडवण्यासाठी
पुरेसा ठरतो…
फक्त एकच प्याला.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २७/०३/२०२६ वेळ : २३:४०

Post a Comment

Previous Post Next Post