कविता – अहंकाराच्या पलीकडचं प्रेम
तुझ्या प्रत्येक शब्दांत
माझं अख्खं विश्व सामावलेलं आहे,
ते मला दिसतं, उमगतं, भिडतं;
म्हणूनच तुझ्या प्रत्येक हावभावासाठी
माझा गर्व
तुझ्या चरणांशी
हसत-हसत विसर्जित होतो.
माझ्या हृदयाच्या आरशात
तुझी प्रतिमा कोरलेली आहे,
ती पुसता येत नाही;
कारण ती आठवण नाही—
तीच माझी ओळख आहे.
तुझ्या दुःखात
मी स्वतःला विसरतो,
तुझ्या आनंदात
मी स्वतःला शोधतो;
कारण प्रेम म्हणजे
स्वतःला हरवणं नव्हे,
तर स्वतःपलीकडे
पोहचण्याचं सामर्थ्य असतं.
आजही शांतपणे सांगतो—
तू एक हाक दिलीस तर,
मी माझ्या अस्तित्वालाही
विश्वासाने तुझ्या हातात देईन;
कारण अहंकार संपतो तेथेच
खऱ्या प्रेमाचा प्रारंभ होतो.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०७/०१/२०२६ वेळ : ०६:३०
Post a Comment