कविता – अपरिचित सहप्रवास
एकाच चौकटीत गुंफलेले
दोन निःशब्द अस्तित्व,
स्पर्श जवळ असताना
अंतर वाढत गेलेले दुरित्व।
आरशात उमटलेले प्रतिबिंब
ओळखीचा भास क्षणिक,
अंतःस्तरात दडलेली
तुटलेली नाळ अनामिक।
श्वसनाची गती समसमान,
भावविश्व मात्र भिन्न,
हृदयाच्या अंगणात
उमटले न संवादचिन्ह।
जगण्याच्या ओझ्याखाली
थकलेले भौतिक रूप,
अर्थाच्या शोधात भिरभिरणारी
सूक्ष्म चेतनेची धूप।
सुख-दुःखांच्या वळणावर
अडखळलेली जीवनधारा,
देहाच्या गर्दीत हरवलेला
आत्मभानाचा किनारा।
यशाच्या उजेडात झाकोळले
संवेदनांचे आभास,
स्वतःशी विसंवादी झालेली
अंतरीची वेदना श्वास।
संस्कारांचे झगमगते आवरण
बाह्यतेचा मोहक थाट,
आत मात्र उसळलेली
अस्वस्थतेची छाया दाट।
नियमांच्या चौकटीत घडलेला
संयमाचा आकार,
आतून हाक देणारी चेतना
मौनाच्या गर्भात साकार।
जन्मापासून शेवटापर्यंत
अपरिचित सहप्रवास,
तरीही न घडलेली
अंतर्मुखतेची ओळख खास।
एक क्षण थांबून आत डोकावले
तर उलगडेल नवे भान,
देह–चैतन्य संयोगातच
जगण्याचे अंतिम स्थान।
आयुष्यभरचा संग तरीही
न उमगलेले सख्य,
अखेरीस उरते मनातच
आत्मभान अस्पर्श।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/०१/२०२६ वेळ : ०४:५०
Post a Comment