कविता – शब्दांच्या उजेडाने जग उजळू या…
जगात अंधार फार नाही,
पण उजेड पाहू इच्छिणाऱ्या
डोळ्यांचीच कमी जाणवते…
म्हणूनच चला—
आपणच होऊ या
एखाद्या थकलेल्या जीवासाठी
कोवळं ऊन,
एखाद्या हरलेल्या मनासाठी
निर्मळ ऊर्जा.
प्रोत्साहनाचं एक वाक्य—
कधी हृदयावर
औषधासारखं काम करतं;
तर कधी
पंखांना नवं आकाश देत
माणसाला उडायला शिकवतं.
जगात टीकेची वादळं
नेहमीच अंगावर आदळतात;
पण आपण—
त्या वादळातली
हळुवार झुळूक होऊ या,
जी मनाला उभारी देईल,
जगण्याला दिशा देईल.
चांगुलपणा दिसायला
मोठे डोळे लागत नाहीत;
फक्त आतून स्वच्छ झालेले
काही क्षण
आणि इतरांमध्ये सौंदर्य बघण्याची
एक साधी, निर्मळ इच्छा पुरेशी असते.
चला—
कमी बोलू नकाराचे शब्द,
आणि मनमोकळेपणानं
उधळूया कौतुकाची फुलं;
कारण कधी कधी
एखाद्याचा दिवस सुंदर करायला
एकच प्रेमळ वाक्य पुरेसं ठरतं.
कुणी पडला तर
हात देऊ या,
कुणी थकला तर
शेजारी थांबू या.
इतरांमध्ये चांगलं पाहण्याची सवय—
हीच तर मानवतेची
सर्वात सुंदर प्रार्थना आहे.
उजेडाची सुरूवात
शब्दांपासून करताना
आणि पुढे मनांपर्यंत पोहोचताना
कदाचित—
आपल्या छोट्याशा कृतीमुळे
कुणाचं संपूर्ण आकाश
एका क्षणात
स्वच्छ निळं होत असेल…
म्हणूनच
जग बदलण्याची जबाबदारी
कोणा एकावर टाकण्याची गरज नाही;
फक्त
एखादं मन हलकं करणारा
लहानसा उजेड होऊ या.
चला…
शब्दांच्या उजेडाने
जग उजळू या…
आणि माणसांतला माणूस
जागवत पुढे चालत राहू या.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०४/१२/२०२५ वेळ : ०९:५४
Post a Comment