कविता – देवापाशी तूच विचार…
मी किती रात्री देवापाशी
तुझी प्रार्थना अलगद मागितली;
तुझ्या स्मरणाच्या मंद पाऊलखुणांनी
स्वप्नांची दारे हलकेच उघडली…
देवापाशी तूच विचार…
हृदय कसं त्या ज्योतीत जळलं,
अश्रूंचं रूपही दीप होऊन उजळलं;
अंधारालेल्या प्रत्येक कडांवर
तुझंच नाव प्रकाशासारखं झळाळलं…
देवापाशी तूच विचार…
जखमा कशा मी कवटाळून ठेवलेल्या,
दुःखाच्या राखेलाही ऊब दिलेली;
तुझ्या नावाच्या थेंबभर चांदण्यात
मनातली वादळं शांत होत विसावलेली…
देवापाशी तूच विचार…
किती नि:शब्द मी आत विरघळलो,
एकांताच्या सावल्यांत मंद विझत गेलो;
स्वतःपासूनही स्वतःलाच लपवून
अश्रूंमध्ये कितीदा हरवत चाललो…
देवापाशी तूच विचार…
हृदयाच्या प्रत्येक धडधडीतून
तुला मागताना प्राणापर्यंत थकलो;
श्वासांचे अंश तुलाच अर्पण केले
किती वेळा मी स्वतःलाच हरलो...
देवापाशी तूच विचार…
किती क्षणांच्या रिकाम्या ओंजळी
तुझ्या नावानंच पुन्हा उजळून उठल्या;
तुलाच नशीब मानून माझ्या
जगण्याच्या दिशा नव्याने खुलल्या…
देवापाशी तूच विचार…
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०९/१२/२०२५ वेळ : २०:४३
Post a Comment