कविता – सांगा ना, बाबा…?


कविता – सांगा ना, बाबा…?

आठवणींच्या सावलीत
तुमचं नाव अजूनही उजळतं–
घराच्या दारावरच्या धुळीत,
खिडकीच्या काचेवरील थेंबांत,
भिंतींच्या शांत भेगांत,
आणि मनाच्या गाभाऱ्यात
दिव्याच्या ज्योतीसारखं 
थरथरत राहतं.

तुमच्या जाण्यानंतर
आठवणींचे काटे मनात खोल रुजले;
दुःखाची धार सतत बोचत राहते,
अश्रूंची धार थांबता थांबत नाही.
कान आजही तुमच्याच 
पावलांचा कानोसा घेत राहतात.

मनाच्या तळाशी दडलेलं 
ते कोवळं प्रेम
तुमच्यापर्यंत कधी पोहोचूच शकलं नाही;
शब्द गिळणाऱ्या शांततेत
हरवून गेलं.

का कोण जाणे—
तुम्ही त्या दूरच्या जगात निघून गेलात,
आणि इथल्या प्रत्येक दिवसाच्या उजेडावर
उदास सावल्या उमटत गेल्या.

तुमच्या नसण्याने
जीवनातील रंग करपून गेले,
गंध फिके पडले,
स्वर तुटून पडले;
शून्याचा परिघ मात्र
दररोज अधिक मोठा होत राहिला.

तुमच्या आठवणींच्या सावलीत
आजही बसलेला आहे मी—
एकटाच, निःशब्द, असहाय;
हृदयाची प्रत्येक धडधडही
तुमचंच नाव घेत राहते,
तुमचाच स्पर्श शोधतं.

तुम्ही गेलात त्या जगात,
जिथे पोहोचत नाही कुठलीही चिठ्ठी,
कुठलीही हाक, कुठलाही निरोप…
तरीही, बाबा,
मनात एक प्रश्न वारंवार उसळतो—

तुमच्या त्या आकाशरस्त्याने
प्रेमाचे शब्द कसे पाठवू?
तुमच्या त्या जगात
निरोप कसा देऊ?
की तडक उठून
तुमच्याकडे येऊ?
सांगा ना, बाबा…?

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०९/१२/२०२५ वेळ : १०:३५

Post a Comment

Previous Post Next Post