कविता – जेण्डर अ‍ॅन आयडेंटिटी


कविता – जेण्डर अ‍ॅन आयडेंटिटी

मी कोण...?
देह की भावना?
विचार की ओळख?
या प्रश्नाचं उत्तर —
कधी आरशात सापडतं,
तर कधी मनाच्या खोल तळाशी हरवतं.

शरीराला दिलेला आकार
हा केवळ प्रकृतीचा प्रारंभ;
पण आत्म्याला मिळालेली ओळख —
तीच सृष्टीचा खरा अर्थ.

देहाला सीमारेषा असतात,
पण भावनांना नाहीत;
रंग, वेश, नाव, संबोधन —
हे फक्त समाजाचे मुखवटे आहेत.

कधी तो वादळासारखा प्रखर,
कधी ती चांदण्यासारखी कोमल,
कधी ते — सागरासारखे विशाल...
आणि त्या सगळ्यांमध्ये वाहतं एकच तत्त्व —
प्रेमाचं, अस्तित्वाचं, अद्वैताचं!

ज्या देवळात देव दगडात असतो,
त्या जगात माणूस लिंगात का बांधायचा?
ईश्वराने कुठे दिली ओळख —
“तू पुरुष, तू स्त्री, तू इतर”?

भावना स्त्रीलिंगी नसतात,
स्वप्नं पुल्लिंगी नसतात;
त्या फक्त मानवाच्या —
एकाच स्पंदनाच्या असतात.
जिथे आस आहे, 
तिथे आकाश आहे;
जिथे माणूस आहे,
तिथेच देवाचा श्वास आहे.

प्रत्येकाचं अस्तित्व शुद्ध असतं
तुळशीच्या ओंजळीतल्या पाण्यासारखं,
जोवर समाज त्यात रंग मिसळत नाही...

ओळख म्हणजे आरशातलं प्रतिबिंब नव्हे,
तर अंतर्मनातला नाद आहे —
जो सांगतो,
“मी आहे, माझ्या स्वरूपात पूर्ण आहे!”

भक्ती म्हणजे स्वीकृती,
आणि स्वीकृती म्हणजेच देवत्व;
जेव्हा आपण प्रत्येक रूपात ईश्वर पाहतो,
तेव्हा ‘जेण्डर’ हा प्रश्न नव्हे —
तो प्रार्थना बनतो.

आणि त्या क्षणी —
मन, शरीर, आत्मा एकत्र येतात;
जणू सृष्टीचं हृदय कुजबुजतं —
“सर्वत्र माझंच अस्तित्व आहे,
मीच स्त्री, मीच पुरुष,
आणि मीच त्या दोघांपलीकडचं सत्य...”
कारण प्रत्येक हृदयात —
देव एकच वसतो,
आणि ती धडधड सांगते —
“मी आहे संपूर्ण सत्य!”

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक ०९/११/२०२५ वेळ : ०६:१२

Post a Comment

Previous Post Next Post